दबावाच्या शक्यतेने उमेदवारांची नावे तुर्तास गुप्त ठेवण्याची रणनिती

पणजी : पणजी महापालिका निवडणुकीत (Panjim Muncipal Corporation Election) बाबूश मोन्सेरात यांच्या भाजप (BJP) समर्थक पॅनल (Panel) विरोधात उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्या नेतृत्वाखाली ‘आमी पणजेकार’ पॅनल निवडणुकीत उतरणार आहे.
महापौर रोहित मोन्सेरात यांचा पॅनलसह पराभव करणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या पत्रकार परिषदेला माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, वैदेही नाईक, मिनीन डिक्रुज, दत्तप्रसाद नाईक उपस्थित होते.
‘आमी पणजेकार’ पॅनल सर्व ३० प्रभागांत उमेदवार ठेवणार आहे. उमेदवार निश्चित असले तरी रणनितीचा भाग म्हणून त्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. नावे जाहीर केली तर त्यांच्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून नावे योग्य वेळी जाहीर केली जातील, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा मला पणजीकरांनी चांगला पाठिंबा दिला होता. स्मार्ट सिटीची कामे, पार्किंग याकडे लक्ष देण्याबरोबर पणजीवासियांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आमचे उमेदवार काम करतील.
स्व. मनोहर पर्रीकर यांचा पुत्र एवढीच माझी ओळख नाही. पणजीचा नागरिक असल्याने मतदान करण्यास निवडणूक लढविण्याचा अधिकार मला आहे, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.
स्व. मनोहर पर्रीकर मित्र : फुर्तादो
स्व. मनोहर पर्रीकर यांच्याशी राजकीय मतभेद असले तरी ते माझे सदैव मित्र होते. महापौर पदाच्या माझ्या कारकिर्दीत पणजी महापालिकेची नवी इमारत होणार होती. स्व. पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले व इमारतीचे काम पूर्ण होऊ शकले नाही, असे सुरेंद्र फुर्तादो म्हणाले.
उमेदवार जाहीर का होत नाहीत? : पर्रीकर
सर्व ३० उमेदवार विजयी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्यांचे उमेदवार जाहीर का होत नाहीत? असा सवाल उत्पल पर्रीकर यांनी केला.
वडील मुख्यमंत्री असताना कुठलेही पद भूषवले नाही : पर्रीकर
माझे वडील स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना मी कोणत्याही महामंडळाचा अध्यक्ष नव्हतो वा कोणत्याही पदावर त्यांनी माझी नियुक्ती केली नव्हती. इच्छा असल्यास त्यांना मला पद देणे शक्य होते असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.