९४ टक्के गावांपर्यंत सुविधा : राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत मोठी आघाडी

पणजी : ग्रामीण भागात ‘५ जी इंटरनेट’ (5G Internet) सुविधा पोहोचवण्यात गोव्याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यातील तब्बल ९४ टक्के गावांमध्ये ५जी सेवा उपलब्ध झाली असून, ही टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय संचार मंत्रालयाने (Union Ministry of Communications) दिली आहे.
केंद्रीय संचार मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, सध्या देशातील ३.६६ लाख गावांमध्ये ५जी इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. यासाठी ५.१८ लाख ५जी मोबाईल टॉवर कार्यरत आहेत. जनगणनेनुसार देशात एकूण ६.४४ लाख गावे आहेत. याचा अर्थ देशातील केवळ ५६ टक्के गावांपर्यंतच ५जी सेवा पोहोचली आहे.
गोव्यात मात्र परिस्थिती खूपच चांगली आहे. जनगणनेनुसार राज्यात एकूण ३३४ गावे आहेत. त्यापैकी ३१४ गावांमध्ये ५जी इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. राज्यात सध्या १,०७७ ५जी टॉवर कार्यरत असून सरासरी प्रत्येक गावामागे तीन टॉवर उपलब्ध आहेत.
५जी सुविधेत राज्यांची क्रमवारी
१ गोवा : ९४ टक्के गावे
२ पंजाब : ९३ टक्के गावे
३ बिहार : ९२ टक्के गावे
शेजारी राज्यांची स्थिती
महाराष्ट्र : ७० टक्के गावे
कर्नाटक : ६७ टक्के गावे
* गोव्याच्या तुलनेत ही प्रगती खूपच कमी असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
५जीमुळे विकासाला गती
५जी तंत्रज्ञान हे ४जीच्या तुलनेत अधिक वेगवान डेटा, कमी विलंब आणि अधिक स्पेक्ट्रम कार्यक्षमता प्रदान करते. त्यामुळे डिजिटल सेवा विस्तार, नवकल्पना, रोजगार निर्मिती, तसेच आरोग्य, शिक्षण, उत्पादन आणि शेती या महत्त्वाच्या क्षेत्रांत मोठे सामाजिक आणि आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.