कुडणे येथे भरदिवसा ‘ब्लॅक पँथर’चे दर्शन

काटांदर समजून युवकाने काढला व्हिडीओ : वन अधिकाऱ्याकडून ब्लॅक पँथर असल्याची पुष्टी

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
17th February, 07:48 pm
कुडणे येथे भरदिवसा ‘ब्लॅक पँथर’चे दर्शन

साखळी : सतीचेभाट, कुडणे (साखळी) येथील क्रीडा मैदानाजवळ सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी गणेश मळीक या युवकाला दिवसाढवळ्या ‘ब्लॅक पॅंथर’चे दर्शन झाल्याची घटना घडली. सकाळी मैदानावर धावत असताना त्याच्यासोबत असलेली कुत्री अचानक मैदानालगतच्या झाडीकडे वेगाने धावली व जोरजोरात भुंकू लागली. त्याचवेळी गणेश याच्या नजरेस लांबलचक काळी शेपटी पडली. कुत्र्यांच्या भुंकण्याने घाबरलेल्या त्या प्राण्याने जवळच्याच एका झाडावर झेप घेतली आणि फांदीवर जाऊन बसला.

प्रथमदर्शनी तो काटांडर असावा, असे समजून गणेश याने मोबाईलवर त्याचा व्हिडिओ चित्रीत केला. मात्र, अधिक जवळून पाहण्यासाठी तो झाडीत उतरताच त्या प्राण्याने झाडावरून उडी मारत उजव्या बाजूच्या जंगलात पळ काढला.

कुडणे सारख्या गावात ब्लॅक पॅंथरचे दर्शन होणे ही आश्चर्याची बाब मानली जात आहे. डिचोली तालुक्यात यापूर्वी अशा प्रकारचे दर्शन झाल्याचे क्वचितच ऐकिवात आहे. विशेष म्हणजे सकाळच्या उजेडात लोकवस्तीजवळ या प्राण्याने वावर केल्याने परिसरात उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी या भागात बिबट्याचे दर्शन झाले होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी एक बिबट्या परिसरात वावरत होता; तो नंतर एका विहिरीत पडला होता. वन खात्याने त्याची सुरक्षित सुटका करून त्याला जंगलात हलवले होते.

सतीचेभाट येथील क्रीडा मैदानावर दररोज अनेक युवक खेळण्यासाठी येतात. गणेश मळीक नेहमीप्रमाणे धावण्यासाठी मैदानावर गेला होता. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ आपल्या स्टेटसवर ठेवला. एका मित्राने त्या प्राण्याबाबत विचारणा केली असता गणेश याने तो काटांडर असल्याचे सांगितले. मात्र मित्राने तो ब्लॅक पॅंथर असावा, असा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर गणेश याने वन खात्यातील परिचित व्यक्तीस व्हिडिओ पाठवला. संबंधित अधिकाऱ्याने व्हिडिओ पाहून तो प्राणी ब्लॅक पॅंथरच असल्याची खात्री दिली. त्यामुळे कुडणे परिसरात ब्लॅक पॅंथरचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या २०१२ पासून कुडणे व परिसरातील खाण व्यवसाय बंद होता. अलीकडे करमळेवाडा, कुडणे येथील खाण पुन्हा सुरू झाल्याने जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात आवाज व वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे वन्यप्राणी स्थलांतर करत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सतीचेभाट परिसरात दिसलेला हा ब्लॅक पॅंथरही अशाच स्थलांतराचा भाग असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.