
पणजी : गोवा सरकारच्या (Goa Government) ऑनलाईन (Online) सेवांसाठी एआय (AI) चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यात मदत होईल. तसेच ऑनलाईन सेवा मिळणे अधिक सुलभ होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मंगळवारी पणजीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयटी मंत्री रोहन खंवटे, संचालक कबीर शिरगावकर, जीईएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती कुमार व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, चॅटबॉट गोव्याच्या डिजिटल (Digital) प्रवासातील एक पुढचा टप्पा आहे. गोवा ऑनलाईन या संकेतस्थळावर एआय चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे संकेतस्थळावरील १५० हून अधिक ऑनलाईन सेवा जलद गतीने मिळतील. लोकांना मिळणाऱ्या सेवा अधिक पारदर्शी होतील. प्रशासन थेट लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच यामुळे सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात देखील मदत होणार आहे.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय किंवा अन्य तंत्रज्ञानाद्वारे नागरिक केंद्रीय सेवा देण्याचे आवाहन केले आहे. गोव्यात अशा सेवा सुरू झाल्याचा आम्हाला अभियान आहे. जबाबदार, सुरक्षित आणि समावेशक एआय तयार करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आज सुरू झालेला उपक्रम त्याचेच प्रतिक आहे आहे. नागरिकांनी या चॅट बोटचा वापर करावा. याबाबत काही सूचना, अभिप्राय असल्यास त्या खात्याला पाठवाव्यात. खात्यातर्फे त्यावर विचार केला जाईल.
लवकरच सर्व खात्यांसाठी चॅटबॉट
रोहन खंवटे म्हणाले की, एआय चॅटबॉटमुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल. सध्या चॅटबॉट गोवा ऑनलाईन संकेतस्थळावरील २७ खात्यांच्या सुविधांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. भविष्यात सर्व सरकारी खात्यांसाठी चॅटबॉट उपलब्ध करून दिले जाईल.