वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली सत्तरी, डिचोली

मानवी वस्तीत वाढता संचार : बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
2 hours ago
वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली सत्तरी, डिचोली

वाळपई : सत्तरी आणि डिचोली तालुक्यात वन्यप्राण्यांचा वावर नवा नाही. मात्र आता थेट मानवी वस्तीजवळ वन्यप्राणी येत असल्यामुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. चरावणे-सत्तरी येथील पोलीस कर्मचारी यशवंत गोपाळ गावस (५८) यांच्यावर शुक्रवारी बिबट्याने हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या यशवंत गावस यांचे उपचारादरम्यान सोमवारी रात्री निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून गावांतील रस्त्यांवर आणि मानवी वस्तीत बिबट्यासह रानडुक्कर दिसून आल्याने ग्रामस्थांत दहशत पसरली आहे. आणखी अपघात किंवा अप्रिय घटना टाळण्यासाठी वन खात्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

सत्तरीत बिबट्यांच्या लोकवस्तीतील वावरामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा आणखी एक दुर्दैवी बळी गेला. चरावणे परिसरातील पोलीस कर्मचारी यशवंत गोपाळ गावस (५८) यांच्यावर शुक्रवारी बिबट्याने हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या यशवंत गावस यांचे उपचारादरम्यान सोमवारी रात्री निधन झाले.

यशवंत गावस शुक्रवारी ठाणे येथून मूळगावी चरावणे येथे दुचाकीने येत होते. अचानक बिबट्याने झेप घेत त्यांच्यावर हल्ला केला. ते रस्त्यावर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. चरावणे मार्गावर बिबट्याचा वावर वाढल्याने वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

कुडणे येथे भरदिवसा ‘ब्लॅक पँथर’चे दर्शन

साखळी : सतीचेभाट, कुडणे (साखळी) येथील क्रीडा मैदानाजवळ सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी गणेश मळीक या युवकाला दिवसाढवळ्या ‘ब्लॅक पॅंथर’चे दर्शन झाल्याची घटना घडली. सकाळी मैदानावर धावत असताना त्याच्यासोबत असलेली कुत्री अचानक मैदानालगतच्या झाडीकडे वेगाने धावली व जोरजोरात भुंकू लागली. त्याचवेळी गणेश याच्या नजरेस लांबलचक काळी शेपटी पडली. कुत्र्यांच्या भुंकण्याने घाबरलेल्या त्या प्राण्याने जवळच्याच एका झाडावर झेप घेतली आणि फांदीवर जाऊन बसला.

प्रथमदर्शनी तो काटांडर असावा, असे समजून गणेश याने मोबाईलवर त्याचा व्हिडिओ चित्रीत केला. मात्र, अधिक जवळून पाहण्यासाठी तो झाडीत उतरताच त्या प्राण्याने झाडावरून उडी मारत उजव्या बाजूच्या जंगलात पळ काढला.

सतीचेभाट येथील क्रीडा मैदानावर दररोज अनेक युवक खेळण्यासाठी येतात. गणेश मळीक नेहमीप्रमाणे धावण्यासाठी मैदानावर गेला होता. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ आपल्या स्टेटसवर ठेवला. एका मित्राने त्या प्राण्याबाबत विचारणा केली असता गणेश याने तो काटांडर असल्याचे सांगितले. मात्र मित्राने तो ब्लॅक पॅंथर असावा, असा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर गणेश याने वन खात्यातील परिचित व्यक्तीस व्हिडिओ पाठवला. संबंधित अधिकाऱ्याने व्हिडिओ पाहून तो प्राणी ब्लॅक पॅंथरच असल्याची खात्री दिली. त्यामुळे कुडणे परिसरात ब्लॅक पॅंथरचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलीकडे करमळेवाडा, कुडणे येथील खाण पुन्हा सुरू झाल्याने जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात आवाज व वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे वन्यप्राणी स्थलांतर करत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सतीचेभाट परिसरात दिसलेला हा ब्लॅक पॅंथरही अशाच स्थलांतराचा भाग असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

सत्तरीत साळींदरने वाढवली शेतकऱ्यांची डोकेदुखी

वाळपई : सत्तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना गवे, रानडुक्कर, माकडे आणि शेकरू यांसारख्या रानटी जनावरांमुळे आधीच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असताना आता साळींदर या प्राण्यानेही त्यात भर घातली आहे. साळींदरांकडून शेती आणि बागायतींची मोठ्या प्रमाणात नासधूस होऊ लागल्याचे प्रकार समोर येत आहेत.

अडवई येथील शेतकरी उदयसिंग राणे यांच्या बागायतीतील सुमारे २० नारळाची झाडे साळींदरांनी एकाच रात्रीत नष्ट केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही झाडे सुमारे तीन वर्षांपूर्वी लावण्यात आली होती. मोठ्या कष्टाने वाढवलेल्या या झाडांची झालेली हानी पाहून उदयसिंग राणे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 

वन्यप्राण्यांचा वाढता ‘दरारा’...

- गेल्या रविवारी मुळगाव (डिचोली) येथील सुनील राऊत यांच्या अंगणात रानडुक्कर नारळ सोलताना दिसला. शनिवारी पहाटेही दोन-तीन नारळ सोललेले आढळले होते. रविवारी सकाळी साडेसहा वाजता घरातील ज्येष्ठ महिलेला दारातच रानडुक्कर दिसल्याने तिची भीतीने गाळण उडाली. या डुकराने अर्धवट सोलून ठेवलेला नारळ दारातच ठेवून धूम ठोकली.

- बोर्डे-डिचोली परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या तक्रारीनंतर वन विभागाने शुक्रवारी सायंकाळी परिसरातील झाडीमध्ये पिंजरा लावला.

- डिसेंबर महिन्यात सालेली (सत्तरी) येथील गोठणवाडा या भागामध्ये बिबट्या ​दिसून आला होता, तर जानेवारी महिन्यात खोडये (सत्तरी) येथील सुरेश गावकर यांच्या वासराचा बिबट्याने बळी घेतला.

- डिसेंबरमध्ये शिरोडवाडी-मुळगाव (डिचोली) येथे हमरस्त्यावरून दुचाकीने जात असताना रस्ता ओलांडण्याच्या नादात बिबट्याने दुचाकीवर उडी टाकल्याने एक दुचाकीस्वार जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले. 

हेही वाचा