बदली केलेल्या दोन पोलिसांची मांद्रे पोलीस स्थानकात २४ तासांत बदली

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
2 hours ago
बदली केलेल्या दोन पोलिसांची मांद्रे पोलीस स्थानकात २४ तासांत बदली

हरमल : हरमल येथील वेश्या व्यवसायाचा ग्रामस्थांनी पर्दाफाश केल्यानंतर तत्काळ जिल्हा राखीव विभागात बदली केलेले मांद्रे पोलीस स्थानकातील पोलीस हवालदार राजेश शिरगावकर व कॉन्स्टेबल सर्वेश मांद्रेकर यांची २४ तासांच्या आत पुन्हा मांद्रे पोलीस स्थानकात नियुक्ती करण्यात आली. पोलीस अधीक्षकांकडून बिनतारी आदेश जारी करण्यात आला.

येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. दोन पोलीस कॉन्स्टेबलांची राखीव दलात बदली करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार आणि तीन सरकारी कर्मचारी अद्याप मोकाट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाचा समूळ नायनाट करण्यासाठी सरकारने ठोस सहकार्य करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल सर्वेश मांद्रेकर आणि राजेश शिरगावकर यांची राखीव दलात बदली करण्यात आली आहे. तथापि, या दोघांसोबतच तीन सरकारी नोकरांचा सहभाग असल्याचे आरोप होत आहेत. त्या संबंधित कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई झाल्याशिवाय हरमलमधील वेश्याव्यवसाय पूर्णपणे थांबणार नाही, असे ग्रामस्थांचे मत आहे. केवळ बदली करून प्रश्न सुटणार नाही. कठोर आणि उदाहरणादाखल कारवाई झाल्यासच भविष्यात कोणीही असा धोका पत्करणार नाही, असे ग्रामस्थ जॅकी फर्नांडिस यांनी सांगितले.

दरम्यान, बदली करण्यात आलेल्या दोन पोलिसांची पुन्हा मांद्रे पोलीस स्थानकात २४ तासांत बदली करण्यात आली. यामुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. 

दरम्यान, अटक करण्यात आलेली शिवानी ही संबंधित व्यवसाय चालवत होती आणि तीच टीम लीडर असल्याचा आरोप आहे. तिचा मोबाईल जप्त करून चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. सुरुवातीला तिने मोबाईल हरवला असल्याचे सांगितले; मात्र नंतर तो मोबाईल सापडल्याची माहिती मिळाली आणि तो तिच्याकडेच राहू दिल्याचा आरोप आहे. या मोबाईलमधून काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मोबाईल ताब्यात न घेतल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

हा व्यवसाय बेकायदेशीर असून, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ज्या धाडसाने बायणा येथील वेश्यावस्ती उद्ध्वस्त केली होती, त्याच तत्परतेने विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही ठोस आणि धाडसी पाऊल उचलून नवा आदर्श घालावा, अशी मागणी होत आहे. गावातील महिलांवर संशयाची छाया पडू नये आणि सामाजिक व्यवहार सुरळीत राहावेत, यासाठी ही घाणेरडी वस्ती तयार होऊ देऊ नये, असे  क्लाउड रॉड्रिग्ज यांनी सांगितले. 

हेही वाचा