श्री रामनाथ दामोदर देवस्थान, जांबावली

केपे तालुक्यातील जांबावली येथे कुशावती नदीच्या काठावर श्री रामनाथ दामोदर देवस्थान आहे. श्री दामोदर हा हरिहरस्वरूप देव आहे. दामबाबाला प्रेमाने ‘भक्तसाहेब’ म्हणतात. देवाचा कौल घेण्याची परंपरा ‘मळीप्रसाद’ या नावाने परिचित आहे.

Story: देवभूमी गोवा |
17th February, 11:36 pm
श्री रामनाथ दामोदर देवस्थान, जांबावली

मूळ दामोदर देवस्थान मडगावमधील म्हाड्डा येथे होते. साडेचारशे वर्षांपूर्वी पोर्तुगीज राजवटीमध्ये, बाटवाबाटवीच्या धास्तीने श्री दामोदर देवाचे महाजन देवाचे आत्मलिंग घेऊन कर्नाटक, केरळपर्यंत गेले. आत्मलिंग जड असल्याने त्याचे नऊ भाग करून सुरक्षितपणे कर्नाटकात नेण्यात आले. त्यापैकी एक भाग बसरुर (कर्नाटक) येथे भूमीवर ठेवलेल्या ठिकाणी स्थिर झाला. (बसरुरमध्ये त्या स्थानावर दामोदर मंदिर बांधण्यात आले आहे).

अशाप्रकारे दामोदर पोहोचले जांबावलीत....

काही काळानंतर, बाटवाबाटवीचा भर ओसरल्यावर आत्मलिंगाचे राहिलेले आठ भाग घेऊन महाजन मंडळी गोव्यात परत आली. रात्रीच्या वेळेस रानात वाट चुकून ते सर्वजण ‘म्हेडे’ जांबावली नामक ठिकाणी पोहोचले. त्या काळात तिथे घनदाट अरण्य होते. देवाचे लिंग जमिनीवर ठेवल्यास तिथेच स्थिर होते, या बसरुरमधील पूर्वानुभवामुळे त्यानी ते लिंग एका गवताच्या गंजीवर ठेवले व रात्रीचा मुक्काम केला. सकाळी उठल्यावर पहातात तर लिंग त्याच ठिकाणी स्थिरावले होते. ‘इथेच देवस्थापना व्हावी’, असा कौल देवाने दिला, अशी सर्वांची धारणा झाली.

मंदिर उभारले, उत्सव सुरू झाले

सांप्रत जांबावलीला ज्या ठिकाणी मंदिर आहे, त्या भागात हेमण्ण नाईक नामक ग्रामप्रमुख (पोलीस पाटील) होते. त्यांनी अभय व आश्रय दिल्यामुळे आत्मलिंग ज्या ठिकाणी स्थिरावले, तिथेच मंदिर उभारून हेमण्ण नाईक यांच्या ‘पाठबळावर’ पूर्वापार चालत आलेले उत्सव, सोमवारची पालखी वगैरे सुरू झाले. हेमण्ण नाईक यांनी दिलेल्या अविस्मरणीय योगदानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ आजही त्यांचे वंशज वर्षातून एकदा कार्तिक पौर्णिमेला देवालयात येऊन दामबाबचे दर्शन आवर्जून घेतात. 

मंदिर प्राकारातील अन्य देवता

श्री दामोदर हा हरिहरस्वरूप देव आहे. मंदिरात श्री रामनाथ- दामोदर प्रमुख देवता आहे. मूळ चांदोर-गोवा (चंद्रपूर) येथून स्थलांतरित झालेल्या श्री लक्ष्मीनारायण देवाची स्थापना गाभाऱ्यात उजवीकडे केलेली आहे. श्री दामोदर पंचिष्ट देवतांमध्ये श्री रामनाथ, लक्ष्मीनारायण, चामुंडेश्वरी, महाकाली, मूळवीर, महेश, गोमेश्वर, म्हारिंगण, भानीदास आणि निराकार या परिवार देवतांचा समावेश आहे. देवालयाच्या जवळच्या खुटीया परिसरात ‘सासष्टपूर्व’ स्थापित आहेत. प्राकारातील एका मंदिरात परिवार देवता श्री चामुंडेश्वरी, महाकाली व महेश (पुरुस) अशी तीन दैवते स्थापित आहेत, हे विशेष. गोमंतकातील देवळांमध्ये श्री दामोदर देवस्थानाला एक विशिष्ट स्थान प्राप्त आहे. देवी महालसा व श्री दामोदर यांचे नाते भावाबहिणीचे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

जीर्णोद्धारावेळी भाविकांनी घेतलेली अनुभूूती

देवालयाचा जीर्णोद्धार आतापर्यंत चार वेळा झाला आहे. शेवटचा जीर्णोद्धार इ.स. १९७२ मध्ये करण्यात आला. पिंडिकेचा जीर्णोद्धार १९१५ साली झाला होता. त्यावेळी भक्तांना आलेली अनुभूती विशेष आहे. मुहूर्ताच्या दोन दिवस आधी तयार करण्यात आलेल्या  पिंडिकेला तडा गेलेला भाविकांना दिसला. विघ्न आल्यामुळे सर्वजण भांबावून गेले. त्याचवेळी अचानक एक व्यक्ती तेथे आली. तिने मंदिर परिसरातीलच एका शिळेपासून मनमोहक पिंडिका बनवून दिली व कार्य निर्विघ्नपणे पार पडले. ती व्यक्ती मात्र परत कधीच कोणालाही दिसली नाही ! 

मंदिरात साजरे होणारे उत्सव

वर्षभरात देवालयात साजरे करण्यात येणारे उत्सव- वड्यांपुनव (आश्विन पौर्णिमा), कार्तिक पौर्णिमेला आवळीभोजन, पिंडिकास्थापना वर्धापनदिन आणि रथोत्सव, शिखर कलशस्थापना वर्धापनदिन, नवरात्र व विजयादशमीला सीमोल्लंघन. अश्विन शुद्ध नवमीला साजरा होणारा ‘तरंगोत्सव’ वैशिष्ट्यपूर्ण असतो. शिशिर ऋतूमध्ये साजरा होणारा शिशिरोत्सव ‘मडगांवकारांचो गुलाल’ या नावाने प्रसिद्ध आहे. दर सोमवारी देवाची पालखी निघते.

दामबाब मडगावकरांचे ग्रामदैवत

श्री दामोदर (दामबाब) हे मडगावकरांचे ग्रामदैवत. मडगावमधून दरवर्षी विशिष्ट बुधवारी केणी यांच्या घरातून श्रीफळ (नारळ) विधीवत जांबावलीला नेण्यात येतो. गुरुवार ते सोमवार असे पाच दिवस मडगावकरांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. फाल्गुन शद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या मंगळवारी गुलाल उधळून उत्सवाची सांगता होते. गुलालाच्या दुसऱ्या दिवशी मंदिर परिसर स्वच्छ केला जातो. धूळभेट घेऊन मडगावकर (मठग्रामस्थ) घरी निघून जातात.

देवस्थानचे महाजन

देवस्थानचे महाजन व त्यांची गोत्रे कौशिक (५ वांगडी), कश्यप (७ वांगडी), भारद्वाज (१४ वांगडी) आणि वत्स (२ वांगडी), असे २८ वांगडी (घराणी) असतात. या देवस्थानाचे महाजन गोव्यात, कर्नाटकात व महाराष्ट्रात सर्व दूरपर्यंत निवास करून आहेत. या देवालयात देवाचा कौल घेण्याची परंपरा ‘मळीप्रसाद’ या नावाने परिचित आहे.

- मंजुनाथ श्रीनिवास पै दुकळे 
अध्यक्ष, श्री रामनाथ दामोदर संस्थान, जांबावली