सीटीझन फॉर डेमोक्रॅसीचा प्रश्न, एसईसीला सादर केले निवेदन

पणजी : मतदार पडताळणी मोहीमे (एसआयआर) (SIR) अंतर्गतची अंतिम मतदार यादी २१ फेब्रुवारी रोजी तयार होत असताना पूर्वीच्याच मतदार यादीवर आधारीत पणजी महापालिकेची (Panjim Muncipal Corporation) निवडणूक (Election) कशासाठी? असा प्रश्न सीटीझन फॉर डेमोक्रॅसी संघटनेने केला आहे. पणजी महापालिका निवडणूक एसआयआर मोहीमेवर आधारीत मतदार यादीनुसार घ्यावी, अशी मागणी केली आहे.
याबाबतचे निवेदन सीटीझन फॉर डेमोक्रॅसीचे पदाधिकारी एल्विस गोम्स यांनी गोवा राज्य निवडणूक आयोगाला (Goa State Election Commission) दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पणजी महापालिका निवडणुकीची घोषणा करताना ११ मार्च रोजी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. १ जानेवारी २०२६ पर्यंत जी पूर्वीची मतदार यादी आहे, यानुसार ही निवडणूक होणार आहे.
एसआयआर मोहीमेअंतर्गतची अंतिम मतदार यादी १४ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होती. आता मतदार यादी जाहीर करण्याची तारीख २१ फेब्रुवारी २०२६ अशी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे मृत मतदारांना गाळण्यासह नवीन मतदारांचा समावेश असलेली यादी २१ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
ही यादी जाहीर झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर पणजी महापालिकेसाठी मतदान होणार आहे. यामुळे एसआयआरवर पणजी महापालिका निवडणूक घेणे सहज शक्य आहे. एसआयआर मतदार यादी प्रमाणे महापालिका निवडणूक घ्यावी, अशी मागणी सीटीजन फॉर डेमोक्रॅसी संघटनेने केली आहे.
नपेक्षा एसआयआरवर आधारीत मतदार यादी वापरणे का शक्य नाही ? याबाबतच्या अडचणी किंवा कायदेशीर बाबी आयोगाने स्पष्ट कराव्या. जुन्या यादीनुसार मतदान झाले तर नव्याने समावेश झालेल्या पणजीतील मतदारांवर अन्याय नाही का होणार? हा अन्याय आयोग कसा दूर करणार, ते स्पष्ट करण्याची मागणी सीटीझन फॉर डेमोक्रॅसी संघटनेने निवेदनाव्दारे केली आहे.