बार्देशमधील शिवोली गावात दांडा येथे जागरोत्सव सुमारे ९०० वर्षांपासून साजरा केला जात आहे. ‘जागरयो’, ‘गडगडया’ व ‘भोंवर’ ही श्री जागरेश्वराची इतर नावे आहेत. हिंदू व ख्रिश्चन लोक मिळून दरवर्षी डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला ‘जागरोत्सव’ साजरा करतात.

गोव्याच्या सांस्कृतिक संचितात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेला, धार्मिक सलोख्याचे सुंदर प्रतीक म्हणजे शिवोलीचा जागर उत्सव (जागरोत्सव).
बार्देश तालुक्यातील शिवोली गावात दांडा येथे जागरोत्सव गेली सुमारे ९०० वर्षांपासून साजरा केला जात आहे. संपूर्ण गोव्यात अत्यंत जागृत असे गणले जाणारे श्री जागरेश्वर देवस्थान येथे आहे. ‘जागरयो’, ‘गडगडया’ व ‘भोंवर’ ही इतर नावे श्री जागरेश्वराची आहेत.
उत्सवात नवस करणे, नवस फेडणे
हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही धर्मांतील लोक मिळून ‘जागर’ करतात. ‘जागरोत्सव’ दरवर्षी डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो. उत्सवाच्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत हजारो लोक देवाला नवस करतात, नवस फेडतात. पहाटे पुरोहितांकडून सर्वांच्या कल्याणासाठी सामूहिक सांगणे केले जाते. ‘जागर’ उत्सवात ओव्या म्हणणारे देवराज विठ्ठल शिरोडकर यांच्या घराण्यामध्ये सांगणे करण्याचा (पुरोहिताचा) मान जातो. सध्या या घराण्यातील सातव्या पिढीचे कन्हैया विठ्ठल शिरोडकर हे जागरेश्वराच्या उत्सवात ओव्या म्हणतात व सांगणे (गाऱ्हाणे) करतात.
तालीमचा प्रारंभ, शेवट शुक्रवारी; तर जागर सोमवारी
‘जागर’ उत्सवाचा प्रारंभ दिवाळी व तुळशी विवाह यांच्यामध्ये होणाऱ्या ‘फोवांची परब’ या लहानशा उत्सवाने होतो. या परबेला वाड्यावरचा दुसरा देव श्री खाजनेश्वर याचा अवसर (भार) होऊन ‘जागर’ उत्सवाच्या तालीमचा नारळ श्री खाजनेश्वर मानकरी घराण्यातील व्यक्तीकडे देतो. हा परब उत्सव रविवारी किंवा बुधवारी साजरा होतो. त्यानंतरच्या पहिल्या शुक्रवारी ‘जागर’ उत्सवाच्या तालीमला, उत्सवातील मानकरी घराण्यांचे व श्री खाजनेश्वर देवाने दिलेला नारळ ठेवून व सांगणे करून प्रारंभ केला जातो. जागर उत्सवाच्या तालीमचा प्रारंभ व शेवट शुक्रवारीच होतो. शेवटच्या तालीमनंतर येणाऱ्या सोमवारी ‘जागर’ उत्सव साजरा केला जातो.
नवसाला पावणारा म्हणून ख्याती
भाविक श्री जागरेश्वर देवाला खोबरेल तेल, अबोलीची फुले, मेणबत्ती, नारळ, उदबत्ती इतर वस्तू अर्पण करतात.
निर्गुण, निराकार, वायूतत्त्व स्वरूपात असलेला देव श्री जागरेश्वर नवसाला हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
जागर दिवशी दिवसभर गाऱ्हाणे
जागर उत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांची ‘मांडा’वर गर्दी सुरू होते. सकाळी सहा वाजताच्या दरम्यान पुरोहित देवराज विठ्ठल शिरोडकर घराण्यातील व्यक्तीतर्फे सर्वप्रथम देवाकडे सांगणे (गाऱ्हाणे) केले जाते. स्थानिक त्याला ‘गाऱ्हाणे घालणे’ असे म्हणतात. हे ‘सामूहिक सांगणे’ असते. सांगणे म्हणजे श्री जागरेश्वर देवाला जे भजतात, त्यांच्या कल्याणासाठी देवाला केलेली आळवणी असते. तद् नंतर भाविकांची वैयक्तिक सांगणी केली जातात. सकाळी सुरू झालेला हा क्रम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालू असतो.
दोन सुवाऱ्यांचा मांडावर एकत्र प्रवेश
रात्री साडेदहाच्या दरम्यान जागर उत्सव सुरू होतो. जागरेश्वराच्या आदिस्थानाकडून एक सुवारी (मिरवणूक) व विरुद्ध बाजूने कपेलकडून दुसरी सुवारी अशा दोन सुवाऱ्या मांडावर एकाचवेळी प्रवेश करतात. गावातील लोक माडांच्या सुक्या झावळांची मशाल करून, मादे, घुमट व कांसाळेच्या तालावर नाचत गात या सुवाऱ्यांत सहभागी होतात. अत्यंत दर्शनीय असे हे दृश्य असते. समस्त भाविक याची उत्कंठतेने प्रतीक्षा करत असतात. मांडाच्या समोर आल्यावर दोन्ही सुवाऱ्या एकाच वेळी मांडावर प्रवेश करतात. नंतर प्रत्यक्षात मांडावरच्या जागर उत्सवास प्रारंभ होतो.
मांडावरील कार्यक्रम
प्रथम पात्र ‘भरभरया’ हे आहे. यामध्ये पुरोहित ओव्यांचे गायन करतो. त्याच्याबरोबर माहे, घुमट व कांसाळे वाजवणारा वाद्यवृंद असतो. त्यांच्या तालावर ‘भरभरया’ पात्राचा नाच सुरू होतो. विशिष्ट अशा प्रकारचे हे नृत्य अत्यंत तालबद्ध असते. फर्नांडिस घराण्याकडे या पात्राचा मान जातो. त्यांच्याबरोबर वाड्यावरचे इतर लोकही या नृत्यात भाग घेतात.
दुसरे पात्र म्हणजे ‘साईद’. हे विनोदी पात्र आहे. ते त्याचे स्वतःचे संवाद मांडावर बोलते व नृत्यही करते. हे सुरू असतानाच ‘राजा’ हे पात्र प्रवेश करते. दोघांचा संवाद होतो व नृत्यही चालू असते. आपापली सोंगे केल्यावर ते दोघे जातात. ‘साईद’ या पात्राचा मान परेरा घराण्याकडे, तर ‘राजा’ पात्राचा मान डिसोझा घराण्याकडे आहे.
नंतर दोन ‘माळीणीं’चे नृत्य होते. त्यांच्याबरोबर त्यांचे नवरे दोन ‘माळीं’च्या रूपात प्रवेश करतात. ‘माळीणीं’चा मान शिरोडकर घराण्याकडे, तर ‘माळीं’चा मान फर्नांडिस व रॉड्रिग्ज घराण्याकडे आहे. माळीणी आणि माळींचे नृत्य संपल्यानंतर जागर उत्सवातील मुख्य पात्र म्हणजेच श्री जागरेश्वराचे नृत्य सुरू होते. समस्त भाविक अत्यंत उत्कंठतेने, आतुरतेने, तसेच श्रद्धेने ज्याची वाट पहात असतात, तो हाच क्षण. हजारो लोक उपस्थित असूनही नीरव शांततेचा दैवी अनुभव यावेळी येतो.
पुरोहित अत्यंत भक्तिभावाने ओव्या म्हणताना, वाद्यवृंद वादन करताना व श्री जागरेश्वराचे नृत्य यांचा संगम, हे एक अलौकिक व विलोभनीय असे दृश्य एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. ‘जागर’ला आल्याचा कृतार्थपणा समस्त भाविकांच्या चेहऱ्यांवर दिसतो.
मध्यांतरात तियात्रांचे सादरीकरण
श्री जागरेश्वराच्या पात्रानंतर मध्यांतर होते. मध्यांतरास गावातील हौशी मंडळी तियात्र करतात. तियात्र संपल्यानंतर ‘जागर’चा उर्वरित भाग सुरू होतो. यामध्ये, म्हारीण, महार (पावलू भूयार), म्हाराले धाकटे व आंतोनपूत अशी चार पात्रे आहेत. यांचा मान क्रमश: काब्राल, परेरा, मेस्त व रॉड्रिग्ज घराण्यांकडे जातो. या पात्रांचा संवाद संपल्यानंतर मांडावरचा कार्यक्रम संपतो.
सुवारींचे विसर्जन केल्यानंतर उत्सवाची सांगता
पुरोहित पहाटे सर्वांच्या कल्याणासाठी सामूहिक सांगणे करतो. पुन्हा एकदा ‘सुवारी’ मांडापासून आदिस्थानाकडे जाते. तोपर्यंत उजाडलेले असते. वाटेत ज्यांची घरे लागतात, ते देवाच्या ‘सुवारी’साठी विविध खाद्यपदार्थ अर्पण करतात. आदिस्थानाकडे पोहोचल्यावर ओव्या म्हणून सुवारीचे विसर्जन केले जाते व कार्यक्रम संपतो.
१७ फेब्रुवारीला वर्धापन दिन
इसवी सन २०१७ पासून जागरेश्वर मंदिराचे नूतनीकरण झाल्यापासून वर्धापनदिवस साजरा केला जातो. ‘१७ फेब्रुवारी’ हा दिवस वर्धापन दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाप्रसाद दिला जातो. हजारो भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसाद सुरू होण्यापूर्वी देवराज विठ्ठल शिरोडकर पुरोहित घराण्यातील व्यक्ती यावेळी सकल भक्तांच्या कल्याणासाठी सांगणे करते. संध्याकाळी विविध कार्यक्रमांनी व सामूहिक सांगणे करून कार्यक्रमाची सांगता होते.