म्हापसा न्यायालयाचे अॅक्सीस बँकेला निर्देश

म्हापसा : बर्च क्लब आग दुर्घटनेनंतर संशयित आरोपी सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांची भागीदारी असलेले व्हायबी हॉस्पीलिटी एलएलपीच्या ‘काहा’ या रेस्टॉरन्टचे गोठवण्यात आलेले बँक खाते खुले करण्याचा आदेश म्हापसा न्यायालयाने अॅक्सीस बँकेच्या मिरत-उत्तरप्रदेश शाखेला दिला आहे.
हणजूण पोलिसांच्या सूचनेनुसार, बँकेने व्हायबी हॉस्पीलिटी एलएलपीचे हे करंट अकाऊंट बँक खाते ११ डिसेंबर २०२५ रोजी गोठवले होते. या कारवाईच्या विरोधात कंपनीच्या भागीदार अन्निका साविओला ग्रासीएस यांनी म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये हणजूण पाेलीस स्थानकातर्फे राज्य, सहाय्यक सरकारी वकील व अॅक्सीस बँकेच्या व्यवस्थापकाला प्रतिवादी बनवण्यात आले होते.
चौकशी अधिकार्यांनी या प्रकरणात भागीदारी फर्मचे खाते गोठवण्याची अधिकारक्षेत्राबाहेरील कृती केली आहे. तपास यंत्रणेला अशा खटल्यात बँकेचे डेबिट खाते गोठवण्याचा किंवा जप्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे निरीक्षण या निवाड्यात म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश ज्यूड सिक्वेरा यांनी नोंदवले आहे. न्यायालयात अर्जदाराच्या वकीने अॅड. पी. राव व सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील पी. फडते यांनी युक्तिवाद केला.
अर्जदारांचा दावा...
- आपल्या कंपनीचे चार भागीदार असून त्यामध्ये दोघे हे लुथरा बंधू आहेत. आमची एलएलपी ही कंपनी नियुक्त भागीदाराद्वारे स्वतंत्र चालते. या भागीदारीवरील कंपनीच्या मार्फत आम्ही काहा या नावाने रेस्टॉरन्टचा व्यवसाय सुरू केला आहे. तसेच या कंपनीच्या नावे ऑक्टोबर २०२४ मध्ये अॅक्सीस बँकेत खाते उघडले होते. ज्याद्वारे आमचा दैनंदिन व्यवहार चालतो.
- आमच्या सुमारे ५० कर्मचार्यांचा पगार आणि कर्जाचे हफ्ते, सरकारी कर प्रणालीचे व्यवहार हे याच बँक खात्यांमार्फत चालवले जाते आणि आमचे दुसरे बँक खाते नाही. शिवाय किरकोळ दैनंदिन व्यवहारासाठी आम्हाला २० ते २२ लाख रुपये खर्च करावे लागतात, असे अर्जदारांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
- लुथरा बंधूंवर हणजूण पोलिसांतील फौजदारी गुन्हा हा बर्च येथे चालणार्या व्यवसायाशी निगडित आहे. त्यात आमचा कोणताही व्यवसायिक वाटा नाही. त्यामुळे आमचे बँक खाते गोठवणे हा पक्षपातीपणा आणि अन्याय असून आमच्या व्यावसायिक प्रतिष्ठेवर आणि कर्मचार्यांच्या उपजीविकेर परिणाम झाल्याचा दावा अर्जदारांनी केला.