गोव्यात तंबाखूमुक्तीसाठी जिल्हा समन्वय समितीचा मोठा निर्णय

‘कोटपा’ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती फलकांचे अनावरण करताना अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरुदास देसाई व इतर अधिकारी.
पणजी : तंबाखू पदार्थांच्या सेवनावर निर्बंध आणण्यासाठी आता राज्यातील कॅसिनो आणि नाईट क्लब्समध्ये (Casinos and nightclubs) ‘कोटपा’ कायद्याची (Kotpa Act) कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचबरोबर ई-सिगारेटच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी विशेष जनजागृती आणि कारवाई करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीच्या (डीएलसीसी) बैठकीत घेण्यात आला.
अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ही बैठक पार पडली. यावेळी बैठकीला समितीच्या सचिव डॉ. नंदिता नाडकर्णी, पणजी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता आर्लेकर, गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स, आरपीएफचे कमांडंट यश मिश्रा, उच्च शिक्षण संचालनालयाचे डॉ. गेरव्हायसो मेंडीस आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत उत्तर गोव्यातील पाण्यात तरंगणारे आणि जमिनीवरील सर्व कॅसिनोमध्ये कोटपा कायदा २००३ मधील सर्व तरतुदींची अंमलबजावणी केली जाईल. तसेच, सर्व नाईट क्लब्सनाही या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सव
आठव्या गोवा तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवात अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे, यासाठी उच्च शिक्षण संचालनालयातर्फे प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी असलेल्या कलम ६ (अ) ची कडक अंमलबजावणी करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.
रेल्वे स्थानक, शैक्षणिक संस्थां होणार तंबाखूमुक्त
* करमळी, थिवी आणि पेडणे ही रेल्वे स्थानके पूर्णपणे तंबाखूमुक्त करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
* उत्तर गोव्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये ‘तंबाखूमुक्त मोहीम ३.०’ राबवली जाईल.
* इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पेका) ई-सिगारेटची विक्री आणि वापरा विरोधात कडक कारवाई केली जाईल.
* ३१ मे रोजी येणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ‘तंबाखू नियंत्रण समिती’ स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.