हरमल येथे बेकायदेशीररित्या वास्तव्य करून राहणाऱ्या विदेशी नागरिकावर गुन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13 mins ago
हरमल येथे बेकायदेशीररित्या वास्तव्य करून राहणाऱ्या विदेशी नागरिकावर गुन्हा

पणजी : गोवा पोलिसांनी (Goa Police) बेकायदेशीररित्या गोव्यात वास्तव्य करून राहणाणाऱ्या विदेशी नाग‌रिकांवर कारवाई सुरू केली आहे. हरमल समुद्रकिनाऱ्यावर (Harmal Beach)  बेकायदेशीररित्या वास्तव्य करून राहणाऱ्या उगांडा (Uganda) येथील नागरिकावर मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बांगी ए. नमबलीरवा (४० वर्षे) असे या इसमाचे नाव आहे. 

मांद्रे पोलिसांनी (Mandrem Police) दिलेल्या माहितीनुसार; खालचावाडा, हरमल, पेडणे येथे वरील इसम बेकायदेशीररित्या वास्तव्य करून राहत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे पासपोर्ट, व्हिसा, प्रवास करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काहीच नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध इमिग्रेशन व फॉरेनर कायदा २०२५ च्या कलम २३ (ए) खाली गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी मांद्रे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक परेश काळे पुढील तपास करीत आहेत. 

दरम्यान, बेकायदेशीररित्या वास्तव्य करून राहत असलेल्या विदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. रशिया येथील युवकाला दोन रशियन महिलांच्या खूनप्रकरणात अटक केल्यानंतर तो युवक व दोन महिलाही बेकायदेशीररित्या वास्तव्य करून राहत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर बेकायदशीर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांवरील कारवाई अधिक कडक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.