खालिस्तानी दहशतवाद्यांच्या ई-मेलमुळे खळबळ

मोहाली: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जीवे मारण्याची धक्कादायक धमकी मिळाल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. 'खालिस्तान नॅशनल आर्मी' नावाच्या दहशतवादी संघटनेने प्रशासनाला एक ई-मेल पाठवून ही धमकी दिली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांना 'पोलोनियम' या अत्यंत विषारी आणि किरणोत्सर्गी पदार्थाद्वारे संक्रमित करण्यात आले असून, त्यांचे हाल माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्यासारखेच केले जातील, असा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सध्या मुख्यमंत्री मान हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल असतानाच ही धमकी आल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

खालिस्तानी दहशतवाद्यांनी पाठवलेल्या या ई-मेलमध्ये केवळ मुख्यमंत्र्यांनाच नव्हे, तर फोर्टिस रुग्णालयासह मोहालीतील १६ नामांकित शाळांनाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर पंजाब पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आले आहे. मोहालीचे पोलीस अधीक्षक दिलप्रीत सिंह यांनी या ई-मेलची पुष्टी केली असून, सर्व सार्वजनिक ठिकाणांची आणि शाळांची कसून तपासणी केली जात असल्याचे सांगितले आहे. दहशतवाद्यांनी स्फोटासाठी दुपारी १ वाजून ११ मिनिटांची वेळ दिली होती, मात्र सुदैवाने तसा कोणताही प्रकार घडला नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याबाबत फोर्टिस रुग्णालयाने स्पष्ट केले आहे की, भगवंत मान यांना अतिथकवा जाणवत असल्याने नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य असून प्रकृती स्थिर आहे. मात्र, दहशतवादी संघटनेने ज्या 'पोलोनियम-२१०' या रसायनाचा उल्लेख केला आहे, तो विज्ञानातील सर्वात घातक रेडिओएक्टिव्ह पदार्थांपैकी एक मानला जातो. शरीरात गेल्यास हा पदार्थ मानवी पेशी आणि डीएनए (DNA) पूर्णपणे नष्ट करतो आणि यावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. यापूर्वी रशियाच्या काही गुप्तहेरांना अशाच पद्धतीने मारल्याचे इतिहास सांगतो, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत आहे.
आम आदमी पक्षाचे नेते बलतेज सिंह पन्नू यांनी जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे. दहशतवाद्यांनी ई-मेलमध्ये माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे मारेकरी दिलावर सिंह यांचा वारसदार असल्याचे सांगत बदला घेण्याची भाषा केली आहे. पंजाबला खलिस्तान बनवण्याची मागणी करणाऱ्या या संघटनेने यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या. मात्र, थेट मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याशी जोडून आणि एका प्राणघातक रसायनाचा वापर केल्याचा दावा केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य प्रचंड वाढले आहे. सध्या पोलीस सायबर सेलच्या मदतीने या ई-मेलचा उगम शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.