एका राष्ट्रीयकृत बॅंकेतील सहाय्यक व्यवस्थापकाला अटक; कर्नाटकात खळबळ

बंगळुरू : एका राष्ट्रीयकृत बॅंकेतील (Nationalised Bank) ग्राहकांचे लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले सुमारे ४ कोटींचे सोने अफरातफर करून व गहाण ठेवून रक्कम ऑनलाईन सटट्यावर उडवल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) किरण कुमार (३४ वर्षे) याला अटक केली आहे. ही घटना बंगळुरूतील (Bengaluru) गिरिनगर शाखेत उघडकीस आली.
पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, शाखा व्यवस्थापक अनुपस्थित असताना लॉकरच्या किल्ल्या घेऊन टप्प्याटप्प्याने गहाण ठेवलेले सोने थोड्या-थोड्या प्रमाणात काढण्यात आले.
२१ पाकिटांमध्ये तफावत
२ जानेवारी रोजी काही ग्राहक ठेवलेले सोने परत घेण्यासाठी बॅंकेत आले असता; हा खळबळ माजवणारा प्रकार उघडकीस आला. लॉकरची पडताळणी करताना २१ पाकिटांतील दागिन्यांमध्ये तफावत आढळली. तीन पाकिटांतील सोने पूर्णपणे गायब असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक तपासात २,७८३ ग्राम सोने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्याची किंमत सुमारे ४ कोटी रुपये एवढे आहे.
अंतर्गत चौकशीत किरण कुमार याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती देण्यात आली. चोरीचे सोने विविध सावकार, सोनारांकडे गहाण ठेवून त्यातून मिळालेली रक्कम ऑनलाईन सट्टा आणि जुगारासाठी वापरल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१.२ किलो सोने जप्त
याप्रकरणी गिरिनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, संशयिताला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १.२ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. उर्वरित सोने परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, संबंधीत वित्तपुरवठादार सहकार्य करत नसल्याने न्यायालयाची मदत घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लॉकरमधील मौल्यवान वस्तूंची पडताळणी करावी : डीसीपी
दक्षिण विभागाचे डीसीपी लोकेश बी. जगलसर यांनी ग्राहकांना आवाहन केले आहे की, लॉकरमधील व गहाण ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची वेळोवेळी पडताळणी करावी, जेणेकरून अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करता येईल.