मडगाव : सागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी 'वंदे मातरम सायक्लोथॉन' मोहिमेची सुरुवात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
48 mins ago
मडगाव : सागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी 'वंदे मातरम सायक्लोथॉन' मोहिमेची सुरुवात

मडगाव: सागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे (CISF) आयोजित ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन २०२६’ मोहीम सध्या गोव्यात दाखल झाली आहे. या मोहिमेद्वारे किनारी भागातील अमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची अवैध वाहतूक आणि सागरी सुरक्षेबाबत मच्छीमार बांधव तसेच स्थानिक तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा मुख्य हेतू असल्याचे अधिकारी प्रवीण कुमार यांनी सांगितले.

सोमवारी या सायकल रॅलीचे नावेली येथील इनडोअर स्टेडियमवर उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचा टप्पा पूर्ण करून ही रॅली आता गोव्यात पोहोचली आहे. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि सीआयएसएफच्या ५७ वर्षांच्या गौरवशाली सेवेनिमित्त या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी सुरू झालेली ही ६,५३३ किलोमीटर अंतराची सायक्लोथॉन एकूण २५ दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून ही मोहीम एकाच वेळी सुरू झाली आहे.

पश्चिम किनारपट्टीवरील संघाने गुजरातच्या लखपत किल्ल्यापासून प्रवासाला सुरुवात केली असून, १६ फेब्रुवारीला हा संघ नावेली येथे दाखल झाला. येथून पुढे हे सायकलपटू कर्नाटकच्या कारवारच्या दिशेने १५६ किलोमीटरच्या प्रवासासाठी रवाना होतील. या मोहिमेत एकूण १०० जणांचा ताफा असून त्यात ६५ सायकलपटूंचा समावेश आहे, ज्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक महिला सायकलस्वार आहेत.

"सुरक्षिततेची जबाबदारी केवळ सुरक्षा यंत्रणांची नसून ती सामान्य नागरिकांचीही आहे," असे आवाहन प्रवीण कुमार यांनी यावेळी केले. 'सुरक्षित तट, समृद्ध भारत' हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेले पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील दोन्ही संघ २२ फेब्रुवारी २०२६ रोजी कोची (केरळ) येथे एकत्र येतील, जिथे या ऐतिहासिक मोहिमेचा समारोप होईल.

हेही वाचा