२१ फेब्रुवारीला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; नाव नसल्यास अपीलसाठी ३० दिवसांची मुदत

१ लाखाहून अधिक नावे यादीतून वगळली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
२१ फेब्रुवारीला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; नाव नसल्यास अपीलसाठी ३० दिवसांची मुदत

पणजी : राज्यातील विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी (Voter list) २१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादीत नाव नसल्यास अपीलसाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

 मुख्य निवडणूक अधिकारी (Chief electoral officer)  संजय गोयल यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. नोट‌िसा बजावून सुनावण्या पूर्ण करण्यात आल्या असून, अंतिम यादीत नाव प्रतिबिंबित झाल्यास ते अधिकृत पुष्टीकरण मानले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

२००२ च्या विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेदरम्यान आणि तांत्रिक, तार्किक विसंगती आढळलेल्या प्रकरणांमध्ये सुमारे २.२ लाख ‘अनमॅप्ड’ व्यक्तींना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. संबंधित सर्व सुनावण्या आता पूर्ण झाल्या आहेत.

अंतिम यादी २१ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्याची मुदत मागील आठवड्यात भारतीय निवडणूक आयोगाने वाढवली होती.

१ लाखाहून अधिक नावे वगळली 

या प्रक्रियेदरम्यान एक लाखाहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यापैकी ४० हजारांहून अधिक मतदार अन्यत्र स्थलांतरीत झाल्याचे आढळले. २९ हजारांहून अधिक मतदारांचा शोध घेऊनही सापडू शकले नाहीत. सुमारे २५ हजार मतदारांचे निधन झाल्याचे दिसून आले.  २ हजार मतदारांची नावे आधीच मतदार यादीत समाविष्ट होती. वास्को, कुठ्ठाळी, फातोर्डा, सांताक्रूझ, ताळगाव या मतदारसंघांतील मतदारांचा त्यात जास्त समावेश होता. 

जिल्हा, मुख्य अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची तरतूद

अंतिम यादीत नाव नसल्यास संबंधीत मतदाराला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर ३० दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे अपील करता येणार आहे. त्यानंतरही समाधान न झाल्यास पुढील ३० दिवसांत मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे दाद मागण्याची तरतूद आहे.

हेही वाचा