गोव्यात महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात ५०० जणांनी पुन्हा केला हिंदू धर्मात प्रवेश

जुने गोवे येथील श्री गोवेश्वर महाशिव मंदिरात भव्य धार्मिक सोहळा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्यात महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात ५०० जणांनी पुन्हा केला हिंदू धर्मात प्रवेश

पणजी : महाशिवरात्रीच्या (Maha shivaratri) मुहूर्तावर जुने गोवे (Old Goa) येथील श्री गोवेश्वर महाशिव मंदिरात भव्य धार्मिक सोहळा पार पडला. या सोहळ्यात सुमारे ५०० जणांनी हिंदू धर्मात (Hindu Religion) पुनर्प्रवेश केल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. यानिमित्त आखाडा परिषदेतील प्रमुख साधुसंत आणि महंतांच्या साक्षीने वेदपठण, हवन आणि पारंपरिक हिंदू विधी पार पडले.




श्री गोवेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३०० जणांनी विधीयुक्त ‘घरवापसी’ केली, तर इतर २०० जणांनी हिंदू धर्म स्वीकारल्याने ही संख्या ५०० वर पोहोचली. देशभरातील विविध आखाड्यांतील संत-महंत या सोहळ्यासाठी उपस्थित होते.




महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे गोव्यातील या ‘घरवापसी’ सोहळ्याची चर्चा होत आहे.

आतापर्यंत दिला १.६३ लाख जणांना हिंदु धर्मात प्रवेश 

दरम्यान,  जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांनी आतापर्यंत १ लाख ६३ हजार ६४३ जणांना पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश दिल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली. आणि यापुढेही हे कार्य सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 



हेही वाचा