विविध विषयांवर तज्ज्ञांचे मिळणार मार्गदर्शन

मडगाव: मडगावातील प्रतिष्ठित संस्था 'गोमंत विद्या निकेतन'तर्फे आयोजित आणि 'फोमेंतो' पुरस्कृत 'विचारवेध २०२६' ही व्याख्यानमाला येत्या १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. यंदाच्या व्याख्यानमालेत डॉ. त्रिलोचन शास्त्री, मिलिंद थत्ते, डॉ. नंदिता डिसोझा, डॉ. रजत तालक आणि डॉ. सदानंद श्रीधर मोरे यांसारखे विविध क्षेत्रांतील दिग्गज आपले विचार मांडणार आहेत.
गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष सलील कारे यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती दिली. १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता संस्थेच्या सभागृहात हे कार्यक्रम होतील. व्याख्यानमालेचे उद्घाटन १८ फेब्रुवारी रोजी डॉ. त्रिलोचन शास्त्री यांच्या व्याख्यानाने होईल. 'असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स'चे (ADR) संस्थापक असलेले डॉ. शास्त्री 'भारत आणि जग: आपल्यासमोरील संधी' या विषयावर भाष्य करतील. १९ फेब्रुवारीला 'वयम' चळवळीचे प्रणेते मिलिंद थत्ते 'एक चळवळ - जनात आणि वनात' या विषयावर आदिवासी हक्कांबाबतचे आपले अनुभव मांडतील.