सावर्डे जिल्हा पंचायत सदस्य मोहन गावकरांनी माफी मागावी : 'गुज'ची मागणी

पणजी: सार्वजनिक मंचावरून पत्रकाराला उघडपणे धमकी दिल्याप्रकरणी सावर्डेचे जिल्हा पंचायत सदस्य मोहन गावकर यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी 'द गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट्स' (गुज) या संघटनेने केली आहे. सत्तेच्या नशेत पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हा लोकशाही मूल्यांचा अपमान असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या गंभीर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहनही संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
धारबांदोडा येथील साकोर्डा येथील सत्पाल मैदानावर माहिती आणि प्रसिद्धी खात्याने 'शिव महोत्सव २०२६' या सरकारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा पंचायत सदस्य मोहन गावकर यांनी एका पत्रकाराला उद्देशून धमकीवजा वक्तव्य केले. पत्रकारांच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या माहिती खात्याच्या अधिकृत कार्यक्रमातच अशा प्रकारचे कृत्य घडणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि भ्याडपणाचे लक्षण असल्याचे 'गुज'ने म्हटले आहे. सरकारी व्यासपीठाचा वापर करून माध्यमांना घाबरवण्याचा प्रयत्न करणे, हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेले थेट आक्रमण आहे.
माध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी 'गुज' सदैव कटिबद्ध आहे. गोव्यामध्ये अशा प्रकारे पत्रकारांना धमकावण्याचे किंवा सत्य दडपण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही संघटनेने दिला आहे. अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केवळ आश्वासन न देता या प्रकरणी ठोस कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. या निषेधार्थ संपूर्ण पत्रकार वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखून माध्यमांशी सन्मानाने वागणे गरजेचे आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.