गोव्यातील विविध तालुक्यांमधील १४ रिक्त असलेल्या पंचायत प्रभागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर

पणजी: पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या घोषणेनुसार, येत्या ११ मार्च २०२६ रोजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून १३ मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त मेनिनो डिसोझा यांनी आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या निवडणूक कार्यक्रमाचा सविस्तर आराखडा मांडला. यावेळी त्यांच्यासोबत आयोगाचे सचिव वेनान्सियो फुर्तादो आणि सहाय्यक संचालक सागर गुरव उपस्थित होते.
पणजी महानगरपालिकेची पाच वर्षांची मुदत २९ मार्च २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. नियमानुसार मुदत संपण्यापूर्वी नवीन महापालिका अस्तित्वात येणे आवश्यक असल्याने, आयोगाने ही निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. महानगरपालिकेच्या एकूण ३० प्रभागांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी ३२,४९६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १५,२२५ पुरुष आणि १७,२७१ महिला मतदारांचा समावेश आहे. ही निवडणूक पक्षातीत (non-party lines) होणार असून मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर केला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक कार्यक्रमाच्या तपशिलानुसार, उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उद्यापासून, म्हणजेच १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना २४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आपले अर्ज सादर करता येतील. अर्जांची छाननी २५ फेब्रुवारी रोजी करण्यात येईल, तर २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ११ मार्च रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत प्रत्यक्ष मतदान होईल आणि १३ मार्चला डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल. निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच पणजी महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक आयोगाने यंदा उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा आणली असून एका उमेदवाराला जास्तीत जास्त २.५० लाख रुपयांपर्यंतच खर्च करता येणार आहे. उमेदवारी अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना २,००० रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १,००० रुपये अनामत रक्कम जमा करावी लागेल. तसेच, प्रभागांच्या आरक्षणाबाबत माहिती देताना आयोगाने सांगितले की, एकूण १० प्रभाग महिलांसाठी, ८ प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) आणि १ प्रभाग अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या शांततामय वातावरणासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून देखरेखीसाठी भरारी पथके आणि निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महानगरपालिकेसोबतच राज्यातील विविध तालुक्यांमधील १४ रिक्त असलेल्या पंचायत प्रभागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. या १४ प्रभागांसाठी ८ मार्च २०२६ रोजी मतदान होणार असून ९ मार्च रोजी मतमोजणी केली जाईल. या पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. पेडणे, डिचोली, बार्देश, साष्टी, फोंडा, केपे आणि काणकोण या तालुक्यातील एकूण १४ प्रभागांचा यात समावेश आहे. या क्षेत्रांतही आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.