आके येथे भव्य श्री गणेश मंदिर उभारणीचा संकल्प; निधी संकलनासाठी 'बंपर' कुपन योजना जाहीर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
36 mins ago
आके येथे भव्य श्री गणेश मंदिर उभारणीचा संकल्प; निधी संकलनासाठी 'बंपर' कुपन योजना जाहीर

मडगाव: आके-मडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव युवक मंडळाने परिसरात भव्य श्री गणपती मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला आहे. या मंदिर उभारणीसाठी निधी संकलित करण्याच्या उद्देशाने मंडळाने 'देणगी कुपन योजना' जाहीर केली असून, यात पहिले बक्षीस २-बीएचके फ्लॅटसह १५ कार जिंकण्याची सुवर्णसंधी भाविकांना मिळणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१९८३ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाने यंदा ४४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या चार दशकांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या या मंडळाने मंदिर उभारणीसाठी जागा संपादित केली आहे. ही जागा मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे कोरगावकर यांनी नमूद केले. खरं तर मंदिराचे काम २०२० मध्येच सुरू होणार होते, परंतु कोविड महामारी आणि तांत्रिक कारणांमुळे हे काम लांबणीवर पडले होते. आता या कामाला गती देण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता कोस्ता फॅक्टरी जवळ, आके येथे कुपन योजनेचा रितसर शुभारंभ होणार आहे.

कुपन योजनेच्या सविस्तर माहितीबाबत सचिव दीपक गडेकर यांनी सांगितले की, ५०० रुपये किमतीची एकूण दीड लाख कुपन्स उपलब्ध असतील. या योजनेतील पहिल्या विजेत्याला मडगाव येथे '२-बीएचके फ्लॅट' आणि ३३ लाख रुपये रोख असे बक्षीस दिले जाईल. दुसऱ्या क्रमांकासाठी 'महिंद्रा बीई कार' व ९ लाख रुपये, तर तिसऱ्या क्रमांकासाठी 'थार एलएक्स' व ६.२५ लाख रुपये अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. एकूण ३.८६ कोटी रुपयांची ही बक्षिसे असून, यात फ्लॅटसह इतर १५ कारचा समावेश आहे. भाविकांनी या देणगी कुपन योजनेत सहभागी होऊन मंदिर उभारणीच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

हेही वाचा