थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

रायपूर: मृत्यू कधी आणि कोणत्या रूपाने समोर येईल, याचा नेम नसतो. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये अशीच एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. डीडी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अश्विनी नगर भागात बॅडमिंटन खेळत असताना ५७ वर्षीय व्यापारी अमृत बजाज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना मैदानावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृत बजाज हे नेहमीप्रमाणे अश्विनी नगर येथील सोनकर बारी मैदानावर मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होते. खेळ रंगात आलेला असताना त्यांनी एक शॉट मारला आणि शटलकॉक खाली पडला. तो उचलण्यासाठी बजाज जसे खाली वाकले, त्याच क्षणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शटलकॉक उचलण्यापूर्वीच ते मैदानात कोसळले. त्यांच्यासोबत खेळणाऱ्या इतर खेळाडूंनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली, मात्र अवघ्या काही सेकंदातच त्यांची प्राणज्योत मालवली.

अमृत बजाज हे आरोग्याबाबत अत्यंत जागरूक होते. कोविड-१९ महामारीनंतर त्यांनी व्यायामाला अधिक महत्त्व दिले होते आणि ते कोणतेही व्यसन करत नव्हते. त्यांना मधुमेह असला तरी त्यांची जीवनशैली अत्यंत शिस्तबद्ध होती. तरीही, तंदुरुस्त वाटणाऱ्या व्यक्तीचा असा अचानक झालेला मृत्यू सर्वांना चकित करणारा ठरला आहे. रायपूरमध्ये गेल्या काही महिन्यांतील ही अशा प्रकारची दुसरी घटना आहे, ज्यामुळे खेळाडू आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेच्या निमित्ताने हृदयरोगतज्ज्ञांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे. विशेषतः ४० वर्षांवरील व्यक्तींनी खेळताना किंवा व्यायाम करताना आपल्या शरीराची क्षमता ओळखणे गरजेचे आहे. छातीत जडपणा जाणवणे, असामान्य घाम येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत पीडित व्यक्तीला तातडीने 'सीपीआर' (CPR) दिल्यास प्राण वाचण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.