गोव्यात व्याघ्र गणनेला मार्चपासून सुरूवात; तीन टप्प्यांत सर्वेक्षण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गोव्यात व्याघ्र गणनेला मार्चपासून सुरूवात; तीन टप्प्यांत सर्वेक्षण

पणजी : २०२६च्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेअंतर्गत (Tiger census) गोव्यात (Goa) मार्च महिन्यापासून तीन महिन्यांची वन्यजीव गणना मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ही गणना मार्चच्या मध्यापासून सुरू होऊन मे अखेरपर्यंत चालणार आहे.

गोव्यातील वनविभागातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून;  हे प्रशिक्षण भारतीय वन्यजीव संस्था (Wildlife Institute of India)  आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकारिणीच्या (National Tiger Conservation Authority)  तज्ज्ञांकडून देण्यात आले आहे. व्याघ्र गणनेसाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यात येणार आहे. तीन टप्प्यांत ही गणना होणार आहे. 

पहिला टप्पा (मार्च महिन्यात)

तयार केलेली पथके वाघांच्या उपस्थितीचे अप्रत्यक्ष पुरावे नोंदवतील. यात पावलांचे ठसे, नखांचे व ओरखड्यांच्या खुणा, विष्ठेचे नमुने तसेच भक्ष्याचे अवशेष यांचा समावेश असेल. याशिवाय जंगलातील वनस्पती घनता, पाणवठे आणि मानवी हालचालींची नोंदही केली जाणार आहे.

दुसरा टप्पा – उपग्रह व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान

या टप्प्यात उपग्रह माहितीचा वापर करून वनक्षेत्राचा विस्तार, भूभागाची रचना, जलस्रोत आणि संभाव्य मानवी अतिक्रमणाचा अभ्यास केला जाईल.

तिसरा टप्पा – कॅमेरा ट्रॅप व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

सर्वेक्षणात निश्चित केलेल्या पायवाटा,  डोंगररांगा  आणि पाणवठ्यांवर कॅमेरा ट्रॅप बसविण्यात येतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने प्रत्येक वाघाची ओळख पटविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या सर्व प्रक्रियेमुळे गोव्यातील वाघांची अचूक संख्या, त्यांचे वास्तव्य क्षेत्र आणि हालचालींचे नमुने समजण्यास मदत होणार आहे. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही गणना महत्त्वाची ठरणार आहे.