नौदल युद्ध महाविद्यालयात गोवा सागरी परिषदचे आयोजन; १४ देश होणार सहभागी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
52 mins ago
नौदल युद्ध महाविद्यालयात गोवा सागरी परिषदचे आयोजन; १४ देश होणार सहभागी

पणजी : नौदलातर्फे (Navy) २१ फेब्रुवारी रोजी येथील नौदल युद्ध महाविद्यालयात (College) पाचव्या गोवा (Goa) सागरी परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे या परिषदेचे प्रमुख पाहुणे असतील. 

परिषदेला १४ देशांचे नौदल प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ही परिषद नौदलाचा एक महत्त्वपूर्ण  धोरणात्मक उपक्रम आहे. समकालीन सागरी आव्हानांवर परिणामकारक आणि व्यावहारिक उपाय काढण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. 

परिषदेत बांगलादेश (Bangladesh), कोमोरोस, इंडोनेशिया (Indonesia), केनिया, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका (Sri Lanka), थायलंड आणि टांझानिया या देशांचे नौदलप्रमुख उपस्थित राहतील. भारताचे नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यजमानपद भूषवतील.

हिंदी महासागर क्षेत्रातील सामायिक सागरी सुरक्षा आव्हाने, अवैध-अनियंत्रित मासेमारी, अन्य अवैध सागरी कृतींपासून उद्भवणाऱ्या धोक्यांचा प्रतिकार करणे याबाबत परिषदेत चर्चा केली जाईल.  

हिंदी महासागर क्षेत्राला विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रादेशिक सुरक्षा, उपजीविकेवर परिणाम होत आहेत. सागरी दहशतवाद, तस्करी, बेकायदेशीर, अनियमित व अप्रमाणित  मासेमारी, चाचेगिरी, अनियमित स्थलांतर यांसारख्या धोक्यांमुळे सुरक्षित समुद्राच्या उद्दिष्टासमोर अडचणी येत आहेत. हवामान बदल, सायबर धोके आणि छुप्या पद्धतीने होणारी सागरी वाहतूक यासारख्या नवनव्या आव्हानांमुळे हे धोके आणखी वाढतात.

या परिषदेत प्रख्यात वक्ते आणि तज्ज्ञ; सागरी क्षमता बळकट करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांवर लक्ष केंद्रीत करतील. माजी नौदलप्रमुख (निवृत्त) अ‍ॅडमिरल अरुण प्रकाश हे मुख्य भाषण देतील. हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा आव्हानांवर संयुक्तपणे उपाय तयार करणे व ते अंमलात आणण्यासाठी गोवा सागरी परिषद हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. भारत आणि हिंदी महासागरी क्षेत्रातील महत्त्वाच्या देशांमध्ये समन्वय, परस्पर सामंजस्य वाढवणे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.