म्हणाला-'त्याने' साध्य केले ते मीही करू शकेन हा विश्वास होता!

कोलंबो : एका चित्रपटाने आयुष्याला कलाटणी मिळू शकते, याचे उदाहरण म्हणजे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उस्मान तारीक (Usman Tariq). ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’तून (MS Dhoni: The Untold Story) प्रेरणा घेऊन पुन्हा क्रिकेट खेळणे सुरू केले. जिद्दीने खेळत राहिला आणि टी२० विश्व कपात खेळून एक स्वप्न पूर्ण केले.
२०१५ साली कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी उस्मान तारीक यांनी क्रिकेट खेळणे बंद करीत दुबईत नोकरी स्वीकारली. मात्र; धोनीवरील चित्रपटाने स्वप्नांना पुन्हा उभारी दिली. आणि आज तो पाकिस्तान संघाकडून टी२० विश्व कप खेळताना दिसत आहे.

खैबर पख्तूनख्वातील नवशेरा येथील तारीक वडिलांच्या निधनानंतर लहान वयातच कुटुंबाचा कर्ता बनला. उपजीविकेसाठी दुबईत ‘रिअल इस्टेट’ कंपनीत खरेदी समन्वयक (पर्चेस कोऑर्डिनेटर) म्हणून नोकरी धरली. त्यात क्रिकेटचे स्वप्न मागे पडत होते.
२०१६ साली ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट पाहण्याचा योग आला. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करत असतानाच कठोर परिश्रमाने क्रिकेटमध्ये इतिहास घडवतो, ही कथा तारीकच्या मनाला भिडली. स्फूर्ती देऊन गेली. “मीही साधा माणूस आहे. मेहनत केली तर मीही काहीतरी करू शकतो,” या भावनेतून पुन्हा क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला.

“धोनीचा चित्रपट पाहिल्यानंतर आमच्या आयुष्यात साम्य वाटले. तोही नोकरी करत होता आणि मीही. धोनीने इतिहास घडवला; मग मी का नाही?” या जिद्दीने आपण पुन्हा खेळायला लागलो, असे तारीक यांनी कोलंबो येथे सांगितले.

फ्रँचायझी लीगपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत
कठोर सराव आणि जिद्दीच्या जोरावर तारीक यांनी विविध फ्रँचायझी स्पर्धांमध्ये छाप पाडली. त्यानंतर जानेवारीत पाकिस्तान -ऑस्ट्रेलिया २०२६ मालिकेतून आंतरराष्ट्रीय संधी मिळाली. त्यानंतर विश्व कप स्पर्धेत मिळालेल्या संधीचे चीज करीत पदार्पणात अमेरिकेविरुद्ध तीन बळी घेत तारीक यांनी दमदार सुरूवात केली.

सध्या, आपल्या गोलंदाजीतून क्रिकेटचे मैदान गाजवत आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरचे सामने, विश्व कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan T20 World Cup 2026) सामन्यापूर्वी तारीकच्या गोलंदाजीच्या ‘अॅक्शन’वरून चर्चा रंगली. मात्र, तो शांत राहिला व जोमाने खेळत राहिला. आज एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू म्हणून ओळख निर्माण करण्यास यशस्वी ठरला आहे.