
वास्को : सडा चौकातील ज्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्या जागेवर मुरगाव बंदर प्राधिकरणाने आपला हक्क सांगितल्याने तेथे तणाव निर्माण झाला. मुरगाव बंदर प्राधिकरणाची दादागिरी आम्ही सहन करणार नाही, १९ रोजी शिवजयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याचे काही शिवप्रेमींनी सांगितले आहे. त्यामुळे तेथे तणाव वाढण्याची शक्यता आहे.
मुरगावातील शिवप्रेमींनी एकत्र येत सडा चौकातील विनावापर असलेल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे ठरविले होते. त्यानुसार ती जागा स्वच्छ करण्यात आली. १९ रोजी शिवजयंती असल्याने १८ रोजी तेथे पुतळा आणला गेला. सदर पुतळ्याचे १९ रोजी अनावरण करण्यात येणार आहे. मात्र तत्पुर्वी त्या जागेवर मुरगाव बंदर प्राधिकरणाने आपला हक्क सांगून तेथे पुतळा उभारण्यास आडकाठी आणली आहे. सदर माहिती मिळताच तेथे काही शिवप्रेमी जमले. त्यांनी प्राधिकरण प्रत्येक जागेवर आपला अधिकार गाजवित असल्याचा आरोप केला. यापूर्वीही सडा चौकातील गणेश मंडप, जेटी येथील हनुमान मंदिर, बायणा किनारा, बोगदा, जेटी येथील घरे यासंबंधीही प्राधिकरणाच्या दादागिरीचा अनुभव लोकांना आला असल्याचे शिवप्रेमी प्रसाद प्रभूगावकर यांनी सांगितले. कवी उद्धव पोळ यांनी ग्रामस्थांनी प्राधिकरणाच्या दादागिरीचा निषेध व्यक्त करण्यासाठी १९ रोजी मोठ्या संख्येने जमावे, असे आवाहन केले. तर शांताराम पराडकर यांनी भव्य मिरवणुकीत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी पुतळ्याचे कोणत्याही परिस्थितीत अनावरण होणारच असल्याचे सांगितले. आम्ही शांतीप्रिय आहोत, आम्हाला प्राधिकरणाने विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी डॉ. धर्मेंद्र प्रभूदेसाई, उर्मिला शिंदे, निधी शेटगावकर, दिव्या वेंगुर्लेकर यांनीही आपले विचार मांडले.