१.९५ लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी खातेदाराविरुद्ध गुन्हा नोंद

म्हापसा : गोवा सरकारच्या (Goa government) एमटीएस कर्मचाऱ्यांच्या पगाराची (salary) १.९५ लाख रुपयांची सरकारी रक्कम चुकून भलत्याच्या बँक खात्यात जमा (wrongly credited in bank account) झाली. ही रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यासह त्यापैकी ८९ हजार रुपये खात्यातून काढून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पर्वरी पोलिसांनी राजू भुरिया (रा. बांदा, कुक्षी-मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पर्वरी सचिवालयातील सामान्य प्रशासन खात्याचे अवर सचिव श्रेयस डिसिल्वा यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. हा बँक खात्यात पैसे जमा होण्याचा प्रकार ३० जुलै व ३१ जुलै २०२५ रोजी घडला होता. दि. ३० जुलै रोजी १ लाख ६२ हजार १२५ व दि. ३१ जुलै रोजी ३२ हजार ८९५ मिळून एकूण १ लाख ९५ हजार २० रुपये संशयिताच्या बँक ऑफ बडोदातील खात्यामध्ये सामान्य प्रशासन खात्याकडून चुकून जमा झाले होते.
हा प्रकार उघडकीस आल्यावर संबंधित बँक खातेदाराकडे फिर्यादी तसेच खात्याच्या इतर अधिकाऱ्यांनी संपर्क साधला व पैसे परत पाठवण्याची विनंती केली. सुरुवातीला संशयिताने पैसे हस्तांतरित करण्याची हमी दिली. मात्र त्याने दिलेले आश्वासन पूर्ण न करता आपल्या खात्यात जमा झालेल्या वरील रकमेपैकी ८९ हजार १०८ रुपये काढले. याबाबतची माहिती मिळाल्यावर तसेच संशयित प्रतिसाद देत नसल्याचे पाहून सरकारच्या सूचनेनुसार फिर्यादींनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या फसवणूकप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३१६(२) व ३१४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मनार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत तळकर हे करत आहेत.