कुडणे येथे आगीत घराचा भाग, कार बेचिराख

अग्निशामक दलामुळे वाचले घर : कष्टाने पिकविलेले भातही आगीच्या भक्ष्यस्थानी

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
18th February, 09:16 pm
कुडणे येथे आगीत घराचा भाग, कार बेचिराख

साखळी : गुरववाडा-कुडणे साखळी येथील शुभम रामकृष्ण सुर्लकर यांच्या घराच्या पडवी व आतील खोली तसेच बाजूला पार्क करून ठेवलेली स्विफ्ट कार आगीमुळे पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कुडणे सरपंचानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

ही घटना मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्या वेळी घरात शुभम सुर्लकर याची आई व पत्नी उपस्थित होत्या. आई झोपली होती, तर पत्नी जागी होती. शुभम सुर्लकर हे काही कामानिमित्त साखळी येथे गेले होते.

घराच्या पडवीकडून काहीतरी आवाज येत असल्याचे लक्षात आल्याने शुभम यांच्या पत्नीने बाहेर येऊन पाहिले असता पडवी व आतील खोलीला आग लागल्याचे दिसून आले. आग वेगाने पसरत असल्याने त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना मदतीसाठी पाचारण केले. शेजाऱ्यांनी शक्य तितक्या प्रमाणात पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती नियंत्रणात येत नव्हती. दरम्यान, शुभम सुर्लकर यांना घटनेची माहिती देण्यात आली व ते तत्काळ कुडणे येथे परतले.

घटनेची माहिती डिचोली अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर दलाचे जवान बंबसह घटनास्थळी दाखल झाले. घरापर्यंत अग्निशमन बंब पोहोचू शकत नसल्याने जवळील देव वेताळ मंदिराजवळ वाहन उभे करून तेथून पाईप जोडून पाण्याची फवारणी करण्यात आली. तातडीने हाती घेतलेल्या बचावकार्यामुळे संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडण्यापासून वाचविण्यात अग्निशामक दलाला यश आले.

पडवीत मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड साठवून ठेवण्यात आले होते. आगीने हे सर्व लाकूड भस्मसात केले. तसेच शेजारच्या खोलीत शेतात कष्टाने पिकविलेल्या सुमारे दोन टन भाताच्या गोण्या साठवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील अर्ध्याहून अधिक भात जळून खाक झाले, तर उर्वरित भाताला आगीची झळ बसल्याने ते वापरण्यायोग्य राहिले नाही.

या खोलीलगत ताडपत्रीच्या शेडखाली उभी केलेली स्विफ्ट कारही आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे बेचिराख झाली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कुडणे सरपंचानी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व बचावकार्यात सहकार्य केले. तलाठींनी घटनास्थळी पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. शुभम सुर्लकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सरपंचांनी सांगितले.

डिचोली अग्निशामकची तत्परता; मोठी दुर्घटना टळली

डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ केसरकर, रामदास परब, महेश नाईक, विष्णू राणे, मिथुन धावसकर, शैलेश साळकर, बाबुली मांद्रेकर व अश्विन मोर्लेकर यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे संपूर्ण घर जळण्यापासून वाचले; अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.


हेही वाचा