उडीवाडा-उसगाव येथे जेसीबी मशीनची वीज खांबाला धडक बसून ४ खांब जमीनदोस्त

शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजू बागायतींचे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22 mins ago
उडीवाडा-उसगाव येथे जेसीबी मशीनची वीज खांबाला धडक बसून ४ खांब जमीनदोस्त

फोंडा : उडीवाडा-उसगाव येथे जेसीबी मशीनची वीज खांबाला धडक बसून ४ खांब जमीनदोस्त झाले. धडक दिल्यानंतर जेसीबी घेऊन चालकाने पळ काढला. परंतु, वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून केळीने उसगाव येथे जेसीबी रोखण्यात यश मिळविले. खांब पडल्याने शॉर्टसर्किट होऊन डोंगराळ भागात लागलेल्या आगीमुळे काजू बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बुधवारी दुपारी चार वाजता जेसीबी मशीन घेऊन चालक नाणूस-उसगावहून उडीवाडा येथे जात होता. त्यावेळी जेसीबीची धडक एका वीज खांबाला बसल्याने ४ खांब जमिनीवर कोसळले. त्यावेळी शॉर्टसर्किटमुळे परिसरातील जंगलात आग लागली. आग लागल्याचे समजताच चालकाने जेसीबीसह तेथून पळ काढला. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळतात त्यांनी पाठलाग करून जेसीबी मशीन केळीनी-उसगाव येथे रोखून धरली. आग लागल्याने डोंगराळ भागात असलेल्या काजू बागायती जळून गेल्या. त्यामुळे काजू बागायतदारांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यावर फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन त्वरित दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली.

मनोहर प्रभू या बागायतदाराने दिलेल्या माहितीनुसार, जेसीबीची धडक जोरात बसल्याने वीज खांब जमिनीवर कोसळला. त्याबरोबर इतर खांब कोसळल्याने परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. डोंगराळ भागात लागलेल्या आगीमुळे काजू बागायती जळून मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.