म्हापसा न्यायालयाचे अॅक्सीस बँकेला निर्देश

म्हापसा : बर्च क्लब आग दुर्घटनेनंतर संशयित आरोपी सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांच्या ‘बिईंग जीएस हॉस्पिलिटी एलएलपी’ची भागीदारी असलेले ‘रीच पिपल हॉस्पीलिटी एलएलपी’च्या मोहाली पंजाब येथील रोमिओ लेन या रेस्टॉरन्ट अॅण्ड बार आस्थापनाचे गोठवण्यात आलेले बँक खाते खुले करण्याचा आदेश म्हापसा न्यायालयाने अॅक्सिस बॅंकेच्या लुधियाना पंजाब शाखेला दिला आहे.
हणजूण पोलिसांच्या सुचनेनुसार, बॅंकेने रीच पिपल हॉस्पिलिटी एलएलपी या कंपनीचे हे करंट अकाऊंट बँक खाते १२ डिसेंबर २०२५ रोजी गोठवले होते. या कारवाईच्या विरोधात वरील कंपनीचे भागीदार असलेले जाझेला ब्रदर्स एलएलपी पार्टनर नवीन ग्रोवर यांनी म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये हणजूण पोलीस स्थानकातर्फे गोवा राज्य, सहाय्यक सरकारी वकील, म्हापसा न्यायालय व लुधियाना अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकाला प्रतिवादी बनवण्यात आले होते.
रीच पिपल हॉस्पीलिटी एलएलपी ही कंपनी नियुक्त भागीदाराद्वारे स्वतंत्र चालते. आमच्या कंपनीचे तीन भागीदार आहेत. यात याचिकादारांची जाझेला ब्रदर्स एलएलपी, राजीव जैन आणि लुथरा बंधूंची बिईंग जीएस हॉस्पिलिटी एलएलपी यांचा समावेश आहे. आमच्या या भागीदारीवरील कंपनीमार्फत आम्ही मोहाली येथे रोमिओ लेन या नावाने रेस्टॉरन्ट अॅण्ड बार आस्थापनाचा व्यवसाय सुरू आहे. तसेच या कंपनीच्या नावे नोव्हेंबर २०२३ मध्ये अॅक्सिस बँकेच्या लुधियाना शाखेत करंट अकाऊंट खाते उघडले होते. याद्वारे आमचा दैनंदिन व्यवहार चालतो. आमच्या सुमारे १०० कर्मचाऱ्यांचा पगार आणि कर्जाचे हफ्ते, भाडे, सरकारी कर प्रणालीचे व्यवहार हे याच बँक खात्यांमार्फत चालवले जातात आणि आमचे दुसरे बँक खाते नाही. शिवाय किरकोळ दैनंदिन व्यवहारासाठी आम्हाला ८० ते ८५ लाख रुपये खर्च करावे लागतात, असे अर्जदारांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
प्रतिवादी बँकेने आम्हाला बँक खाते गोठवण्याचे कारण स्पष्टपणे सांगितले नाही. शिवाय कोणतीही लेखी सूचना दिली नाही. हणजूण पोलीस स्थानकात नोंदवलेल्या कथित गुन्ह्यासंदर्भात खाते गोठवण्यात आल्याची तोंडी माहिती बँकेने आम्हाला दिली. या गुह्याशी आमचा निधी किंवा व्यवहाराशी संबंध नाही. आमची कंपनी ही मर्यादीत भागीदारी दायित्व (एलएलपी) कायद्यानुसार चालते. हणजूण पोलिसांत नोंद झालेल्या फौजदारी गुन्ह्याशी आमचा किंवा आमच्या कंपनीच्या व्यवसायाशी कोणताही संबंध नाही. त्यात आमचा कोणताही व्यवसायिक वाटा नाही. आमचा व्यवसाय हा कायदेशीर व पारदर्शक आहे. त्यामुळे आमचे बँक खाते गोठवणे ही पक्षपाती आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे उल्लंघन करणारी कारवाई आहे. यामुळे आमचा दैनंदिन व्यवहार ठप्प झाला असून कर्मचाऱ्यांच्या उपजिवीकेवर परिणाम होऊन मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचा दावा अर्जदारांनी न्यायालयात युक्तीवाद करताना केला.
सरकारी वकिलांनी सांगितले की, लुथरा बंधूंचाअर्जदाराच्या भागीदारी फर्ममध्ये मोठा वाटा आहे. हे बँक खाते गोठवण्याचे कारण म्हणजे लुथरा बंधूंवर गंभीर गुन्ह्याचा आरोप असून २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत आणि जखमींसाठी भरपाईची मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. यासाठी भागीदारी खात्यातील निधी जतन करणे आवश्यक आहे. कामगार आयुक्तांनी लुथरांना नोटीस बजावत मृतांच्या कुटुंबियांना देय भरपाई रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बँक खाते गोठवणे हे सदर कायदेशीर निर्देशांच्या पालनाचा एक स्त्रोत असल्याचा दावा त्यांनी युक्तीवादावेळी केला.
न्यायालयात अर्जदाराच्यावतीने अॅड. पी. राव तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील पी. फडते यांनी युक्तीवाद केला.
अधिकार क्षेत्राबाहेर खाते गोठवले
हणजूण पोलीस चौकशी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात भागीदारी फर्मचे खाते गोठवण्याची कृती ही आपल्या अधिकार क्षेत्राबाहेरील केली आहे. तपास यंत्रणेला अशा खटल्यात बॅंकेचे डेबिट खाते गोठवण्याचा किंवा जप्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे निरीक्षण या निवाड्यात म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश ज्यूड सिक्वेरा यांनी नोंदवत बँक खाते खुले करण्याचे निर्देश प्रतिवादी बँक शाखेला दिले.