वन खात्याने पुन्हा लावला पिंजरा : गेले तीन दिवस राधानगरात दिवसाचेही दर्शन

डिचोली : बोर्डे-डिचोली परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून राधानगर येथे रात्री तसेच बुधवारी दिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील लोकांमध्ये अधिक धास्ती पसरली आहे.
बुधवारी सायंकाळी राधानगरातील नागरिकांनी बैठक घेऊन वन अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली. त्यानंतर वन खात्याचे कर्मचारी सायंकाळी उशिरा तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि राधानगर परिसरात पिंजरा बसवण्यात आला.
स्थानिकांकडून वारंवार बिबट्याचे दर्शन झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर वन विभागाने गंभीर दखल घेत शुक्रवारी संध्याकाळी बोर्ड परिसरातील झाडीमध्येही पिंजरा लावला होता. गेल्या गुरुवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर परिसरात पहारा ठेवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यावेळी बिबट्या दिसून आला नाही. तरीही पहाटेच्या तसेच उशिरा रात्रीच्या वेळी अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली आहे.
याशिवाय परिसरातील काही पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक रहिवासी विश्वास गावस यांनी वन खात्याकडे पत्राद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पिंजरा बसवला आहे.
विद्यार्थी, पालकांमध्येही चिंतेचे वातावरण
बोर्डे मठ, दत्त मंदिर तसेच शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय या परिसरात नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. गेल्या तीन दिवसांपासून राधानगर परिसरात वारंवार बिबट्याच्या हालचाली दिसून आल्याने अखेर येथे पिंजरा लावण्यात आला आहे.