सुतार, गवंडी, वीणकाम करणाऱ्या कामगारास राज्यात अधिक रोजंदारी

नियोजन, सांख्यिकी खात्याचा अहवाल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th February, 11:53 pm
सुतार, गवंडी, वीणकाम करणाऱ्या कामगारास राज्यात अधिक रोजंदारी

पणजी : राज्यात विविध प्रकारच्या कुशल कामांसाठी कामगारांची मागणी वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने सुतार, गवंडी, विणकाम करणाऱ्या कामगारांना तुलनेने अधिक रोजंदारी मिळते. नियोजन आणि सांख्यिकी खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार, सुतार कामासाठी सरासरी १,०३७ रुपये तर गवंडी कामासाठी ९१७ रुपये रोजंदारी दिली जाते. उत्तरेच्या तुलनेत दक्षिण गोव्यात तुलनेने अधिक रोजंदारी दिली जाते. यासाठी सांख्यिकी खात्याने प्रत्येक तालुक्यातील ४ गावांची निवड करून तिथे सर्वेक्षण केले.
खात्यातर्फे, राज्यात सुतार, लोहार, गवंडी, बांबू काम, कुंभार, विणकर, दगड फोडणे तसेच अन्य स्वरूपाच्या कामांसाठी दिल्या जात असणाऱ्या रोजंदाजीची माहिती गोळा केली. यामध्ये ग्रामीण भागातील एकूण ४८ गावांची निवड करून तिथे हे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये कुशल व अकुशल, महिला आणि पुरुष कामगारांची माहिती घेण्यात आली.
राज्यात कामाच्या प्रकारानुसार विणकाम करणाऱ्या कामगारांना ८११ रु., लोहारकामास ८०५ रु., दगड फोडणाऱ्या कामगारांना ७७२ रु., कुंभार काम करणाऱ्या पुरुष कामगारांना ७३४ रुपये सरासरी रोजंदारी दिली जाते. तर अन्य प्रकारच्या कामगारांना ५५० ते ६७३ रुपये पर्यंत रोजंदारी दिली जाते. लोहारकाम वगळता अन्य सर्व कामांसाठी पुरुषांच्या तुलनेत महिला कामगारांना मिळणारी रोजंदारी १०० ते ५०० रुपयांनी कमी आहे. संपूर्ण राज्यात महिला कामगारांना सरासरी ५०२ रुपये रोजंदारी देण्यात येत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

उत्तर-दक्षिणेत रोजंदारीत मोठी तफावत

* उत्तर गोव्यात पुरुषांना मिळणारी सरासरी रोजंदारी ७१० रु. आहे.

* दक्षिण गोव्यात पुरुषांना मिळणारी सरासरी रोजंदारी ८७३ रु. आहे.

* संपूर्ण राज्याची एकूण सरासरी रोजंदारी ७९० रु. आहे.