पेडणेची ‘पुनव’

‘पेडणेची पुनव’ कोजागरी पौर्णिमेला साजरी केली जाते. या उत्सवात भाविक देव दर्शन घेऊन देवाचा कौल घेतात. उत्सवात गोव्याच्या विविध भागातून आणि महाराष्ट्र, कर्नाटक तसेच इतर राज्यांतून भाविक येतात. उत्सवात श्री देव रवळनाथ आणि श्री देव भूतनाथ यांच्या तरंगांचे दर्शन घेतले जाते.

Story: जत्रा |
19th February, 11:49 pm
पेडणेची ‘पुनव’

पावसाळ्यातील रिपरिप कमी झाली आणि आल्हाददायक सूर्याच्या किरणांची पखरण सुरू झाली की गोव्यातील लोकमानसाला शरद ऋतूचा प्रारंभ झाल्याची जाणीव होते. पूर्वीच्या काळी पावसाळ्यात भाताची कणसे मस्तपैकी शेतात डोलू लागायची आणि कणसे प्रथम देवाला अर्पण केल्यानंतर अन्नदात्याच्या धरतीविषयी अंतःकरणात असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी कृषक समाजात अनेक विधी, परंपरा जन्माला आल्या. त्यात नवरात्री आणि महानवमीच्या रात्रीनंतर येणारा विजयादशमीचा उत्सव महत्त्वाचा आहे. विजयादशमी हा पवित्र दिवस आश्विनातील शुक्ल पक्षातल्या दहाव्या दिवशी येतो आणि तेव्हा हर्षोल्हासित झालेल्या शेतकरी समाजामार्फत तरंगांच्या मिलनाद्वारे ‘शिवलग्ना’चा सोहळा गोव्यातल्या बऱ्याच देवस्थानात संपन्न होतो. त्यात उत्तर गोव्याच्या एका टोकाला महाराष्ट्राच्या सीमेलगत अस‌लेल्या पेडणे शहरातल्या नवरात्री ते कोजागिरी असे जवळजवळ पंधरवडाभर संपन्न होणाऱ्या उत्सवाची शान काही औरच असते.

मानवी मन उत्सवप्रिय असून, त्यात निसर्गसंपन्न पेडणेत राहणाऱ्या लोकमानसाने शेकडो वर्षांपासून असंख्य उत्सवांची परंपरा निर्माण केलेली आहे. त्यात पेडणे शहरात पंधरवडाभर चालणारा शरद ऋतुतल्या प्रसन्नतेला समृद्ध करणारा दसऱ्याचा सण महत्त्वाचा आहे. पेडणे तालुक्याचे मुख्यालय असलेले हे शहर देशप्रभूंसारख्या संस्थानिकांची स्मृती जागवणाऱ्यांसाठी जसे ख्यात आहे, तसेच ते कष्टकरी बहुजन समाजाच्या कर्तृत्वासाठी पूर्वापार प्रसिद्ध आहे. पेडणे शहर आणि तालुका पोर्तुगीज सत्ताधिशांकडे जुन्या काबिजादीतल्या प्रांतासारखा प्रदीर्घकाळ गुलामगिरीत राहिला नसल्याने या शहरातली शतकोत्तर इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देणारी संचिते आजच्या बदलत्या काळातही इथे पहायला मिळतात. तालुक्याचे ठिकाण म्हणून सावंतवाडकर भोसले आणि त्यानंतर पोर्तुगीज अामदानीत पेडणे शहराचा लौकिक कायम राहिलेला असल्याने इथे नाना जाती, धर्म, पंथांच्या लोकांनी वास्तव्य केले आणि त्यामुळेच पेडणे शहरात भगवती, रवळनाथ, माऊली, सांतेर, मुळवीर, महादेव, नारायणदेव, द्वारपाळ आणि सती या दैवत परिवाराबरोबर इथे भूतनाथ, आदिनाथ, पुरावचारी, काळभैरव, म्हारींगण, नितकारी, सत्पुरूष, डाड-साखळ्याे आदी देवतांचे प्रस्थ अनुभवायला मिळते. परंतु असे असले तरी पेडणेच्या मुख्य बाजारपेठेत विराजमान भगवतीच्या देवस्थानाला ग्रामदेवतेचा सन्मान लाभला असून पेडणे शहरातल्या पंधरवडाभर संपन्न होणाऱ्या दसऱ्याच्या उत्सवाला तिच्या मंदिरातून शुभारंभ होतो. भगवती देवी हे स्त्री तत्व, तर रवळनाथ हे पुरुषत्व मानून स्त्री-पुरुषाच्या समागमातून निर्मिती व्हावी हे कधीतरी आपल्या पूर्वजांनी अपेक्षित धरले आणि दसऱ्याच्या उत्सवाला भगवतीचा कळस आणि रवळनाथांच्या तरंगाच्या मेळामेळीला ‘शिवलग्न’ अशी संज्ञा प्रदान केलेली आहे.

गोव्यातल्या बऱ्याच देवस्थानात दसऱ्याच्या दिवशी तरंगांची मेळामेळ संपन्न झाल्यावर ही धार्मिक संचिते परंपरेने ठरलेल्या मार्गाने पारंपरिक रितीरिवाजांना प्राधान्य देत भाविक, महाजन यांच्या घरी मुक्कामाला जातात. परंतु पेडणेत मात्र भगवती, रवळनाथ आणि भूतनाथ यांच्या तरंगांची अभूतपूर्वक मिरवणूक शरद ऋतुतल्या कोजागरीच्या चांदण्याला आगळीवेगळी किनार मिळवून देते. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी देवीची पाषाणी मूर्ती गर्भगृहात प्रतिष्ठापित केलेली असून पालखीसाठी देवीची उत्सवमूर्ती नेली जाते, तर तरंगोत्सवाच्या मिरवणुकीसाठी रवळनाथ आणि भूतनाथाच्या तरंगांसह भगवतीच्या कळसाचा समावेश असतो. रवळनाथाचे जुने-मंदिर बाजारातल्या म्हाऊसवाड्यावर असून भूतनाथाच्या मंदिराचे मात्र जुन्या काळातले भग्नावशेष डोंगरटेकडीवरच्या जंग‌लात पहायला मिळतात. भगवतीनंतर पेडणे येथील श्री रवळनाथ देवस्थानाला दसऱ्याच्या उत्सवात महत्त्वाचे स्थान असल्याने दसऱ्याला रवळनाथ देवाच्या प्रतिकात्मक तरंगाला बावीस साड्या पारंपरिक पद्धतीने, तर भूतनाथाच्या तरंगाला एकवीस साड्या नेसवल्या जातात. या दोन्ही तरंगांची आदिस्थानावर पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करतेवेळी जी नऊ धान्ये रुजत घातली होती ती रुजवण दसऱ्याच्या दिवशी काढल्यानंतर ती या दोन्ही तरंगांना अर्पण करतात. त्यानंतर ही तरंगे रवळनाथाच्या मंदिरातून मिरवणुकीने भगवतीकडे नेतात. तत्पूर्वी ही तरंगे मठात ठेवली जातात. चव्हाट्याजवळ ही तरंगे जेव्हा येतात तेव्हाच तेथे भगवतीचा कळस आणला जातो. कळस आणि रवळनाथाच्या तरंगाचा शिवलग्नाचा विधी संपन्न होतो. आश्विन शुक्ल द्वादशी ते आश्विन शुक्ल त्रयोदशीपर्यंत आदिस्थानी तरंगांची पूजा अर्चा चालू रहाते. तत्पूर्वी ही तरंगे परंपरेने ठरलेल्या स्थळी जातात.

पेडणेच्या दसऱ्यात कोजागरी पौणिमेची शारदीय चंद्रकलेत न्हाणारी रात्र विशेष महत्त्वाची असून मध्यरात्री गाऱ्हाणे घातल्यानंतर ही तरंगे आदिस्थानावर उभी ठेवतात आणि 

कौल दिला जातो. भुताखेतांचे अस्तित्व विज्ञानाने मान्य 

केलेले नसले तरी गोव्यात आजही माणसांना ही भुतेखेते पछाडतात आणि त्यांना कोजागरीच्या चांदण्यात 

रवळनाथ-भूतनाथ तरंगांच्या साक्षीने पिटाळून लावण्याचे विधी केले जातात. भुताखेतांचे प्रस्थ उद्धवस्त करण्यासाठी प्रथम भूतनाथ आणि त्याला शक्य झाले नाही तर रवळनाथ 

प्रयत्न करतो, असे इथले श्रद्धाळू लोक मानतात. कोजागरी पोर्णिमेचा चंद्र शीतल चांदण्याचा वर्षाव करत मध्यावरून 

सरकत चालला तरी पेडणेच्या पुनवेचा उत्सव चालूच रहातो. याच रात्री भूतनाथाला भग्नावशेष असलेल्या ठिकाणी नवीन मंदिर पुढच्या वर्षीचा दसरा येण्याअगोदर बांधून देणार असल्याचे आश्वासन दिले जाते. दसऱ्याच्या पंधरवडाभर चालणाऱ्या या उत्सवात भाविकांची गर्दी क्रमाक्रमाने वाढत जात कोजागरी पौणिमेच्या रात्री भाविकांचा अक्षरशः महापूरच पेडणे शहरात लोटतो. या उत्सवाच्या विधी, परंपरा आदींतून इथल्या लोकमानसाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विश्वाचे दर्शन घडते.