श्री चंद्रेश्वर भूतनाथ जत्रोत्सव

श्री चंद्रेश्वर म्हणजेच श्री शंकर. काही कारणास्तव कैलास पर्वत सोडून देव गोमंतकात आले. विश्रांतीसाठी पारोडा येथे कुशावती नदीच्या तीरावर बसलेल्या ईश्वराचे लक्ष उंच पर्वत शिखराकडे गेले. तेथील निसर्ग सौंदर्यावर भाळलेल्या भोलानाथांनी शिखराकडे कूच केली आणि त्या निर्जनस्थळी ते स्थानापन्न झाले.

Story: जत्रा |
19th February, 11:51 pm
श्री चंद्रेश्वर भूतनाथ  जत्रोत्सव

आकारमानाने गोवा राज्य छोटे असले तरी सौंदर्याची खाण असलेली सुजलाम् सुफलाम् भूमी पर्यटन क्षेत्रामध्ये नावाजलेली आहे. त्यामुळे हजारो पर्यटक वर्षाकाठी गोव्याला भेट देऊन देवदर्शन घेतात. जवळजवळ २००० वर्षांपूर्वीचा इतिहास सांगणारी, कदंबकालीन वास्तुशिल्पाचा, बांधकामाचा नमुना असणारी, भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या देवदेवतांची कितीतरी मंदिरे गोव्यामध्ये पहावयास मिळतात. गोमंतकीयाच्या मनात देव ही संकल्पना रुजवणारे अती प्राचीन मंदिर म्हणून ‘श्री देव चंद्रेश्वर भूतनाथ’ या मंदिराची गणना केली जाते. जवळजवळ सहा हजार वर्षांपूर्वीच्या दक्षिण गोव्यातील पारोडा या पर्वत शिखरावर असलेल्या मंदिरात श्री देव चंद्रेश्वराची अतिशय सुबक अशी मूर्ती आहे. मंदिराच्या पुढील भागात म्हणजेच दोन्ही देवांची दृष्टादृष्ट होईल अशा बेताने श्री भूतनाथांचे शिळारूप पहावयास मिळते. श्री चंद्रेश्वर म्हणजेच श्री शंकर. काही कारणास्तव कैलास पर्वत सोडून देव गोमंतकात आले. विश्रांतीसाठी केपे तालुक्यातील पारोडा येथे कुशावती नदीच्या तीरावर बसलेल्या ईश्वराचे लक्ष उंच पर्वत शिखराकडे गेले. तेथील निसर्ग सौंदर्यावर भाळलेल्या भोलानाथांनी त्याचक्षणी शिखराकडे कूच केली आणि त्या निर्जनस्थळी ते स्थानापन्न झाले. डोंगरमाथ्यावर निरनिराळी पिके काढून चरितार्थ चालवणाऱ्या कष्टकरी समाजाला देवाने दर्शन दिले. भक्तजनांनी देवपूजा, आपल्या जवळ असलेल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवून देवाची सेवा केली. पुढे राजा भोज याने मंदिराचा पाया घातला. नंतर आलेल्या चंद्रादित्य वर्मा चालुक्य, मौर्य, शिलाहार, कदंब या राजघराण्यांनी हे देवस्थान वैभव शिखरावर पोहोचविण्याचे महान कार्य केले.

श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थान पर्वत पारोडा या ठिकाणी जाण्यासाठी जवळजवळ ४०० पायऱ्या चढून जावे लागते. पण साठी ओलांडलेला माणूसही देवावरील श्रद्धेने म्हणा अथवा ईश्वरकृपेने म्हणा हा पर्वत सहज चढून जातो. पायऱ्या चढताना अर्ध्या वाटेवर एक तळी आहे. ‘कमंडलू तीर्थ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या तळीच्या पाण्याने देवांना रोज अभिषेक घालण्याची प्रथा आजही पाळली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांतर्फे घालण्यात येणाऱ्या अभिषेकासाठीसुद्धा हेच पाणी वापरण्याची परंपरा आहे. वर्षभरामध्ये होणाऱ्या उत्सवामध्ये प्रत्येक सोमवारी भजनाचा कार्यक्रम व पालखी मिरवणूक काढतात. शिवाय महाशिवरात्री, दिवजोत्सव, शिमगोत्सव, चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव, असे परंपरागत विविध उत्सव साजरे केले जातात. शिमगोत्सवात हळदुणे झाल्यानंतर ‘श्रीं’चा अवसर येतो. बावीस वाड्यांचा अधिपती अशी ख्याती असलेल्या ईश्वराचा कौल घेण्यासाठी गुलाल उधळतात. भक्तजन कुशावतीच्या पाण्यात आंघोळ करतात. नदीला नारळ अर्पण करून ‘श्रीं’च्या आशीर्वादाने फाल्गुन वद्य एकादशीपासून सुरू झालेल्या शिमगोत्सवाची सांगता होते.

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा हनुमान जन्मोत्सव हा येथील सर्वांत मोठा व प्रसिद्ध उत्सव. चैत्र शुद्ध एकादशीपासून सुरू होतो. सतत पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक विधी, लघुरुद्र, अभिषेक, महाआरती, कीर्तन वगैरे कार्यक्रम असतात. पहिल्या रात्री देवाची शिबिकोत्सव, दुसऱ्या रात्री अंबारीतून मिरवणूक, तिसऱ्या दिवशी चांदीच्या रथातून, चौथा दिवस विजयरथ, तर पाचव्या रात्री दिवजांची भोवर व ‘श्रीं’ची महारथातून मिरवणूक काढतात. पाचही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा गौरव, सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन असते. उत्सवाच्या दिवसात रोज दुपारी व रात्री अन्नसंतर्पणाचा लाभ असतो. एरवी नीरव शांतता असणारे पर्वत शिखर जत्रेच्या निमित्ताने गजबजून जाते. मेवा, मिठाई, खेळणी, लाकडी सामान, भांडी-कुंडी, कपडेलत्ते यांची दुकाने थाटलेली असतात. पर्वत शिखरावर उभे राहून खाली पाहिल्यास दक्षिण गोव्यातील काणकोणपर्यंतचा सारा परिसर पौर्णिमेच्या पिठोरी चांदण्यात न्हाऊन निघालेला दृष्टीस पडतो.