अग्निदिव्याचे प्रायश्चित घेणारी शिरगावची देवी लईराई

व्रतस्थ धोंड वैशाख वणवा पेटलेला असताना शुक्ल पक्षातल्या पंचमीच्या दिवशी शिरगावात येऊन वारूळ रूपातल्या जननीचे दर्शन घेतात. हातात रंगीबेरंगी गोंड्यांनी सजलेली वेतकाठी घेऊन पारंपरिक वेषातले धोंड गळ्यात मोगरीच्या कळ्यांच्या सुवासिक माळा परिधान करून निखाऱ्यावरून जाण्याचा अनुभव घेतात.

Story: जत्रा |
19th February, 07:07 pm
अग्निदिव्याचे प्रायश्चित घेणारी शिरगावची देवी लईराई

दरवर्षी वैशाख शुक्ल पंचमीदिवशी डिचोलीतल्या शिरगावात देवी लईराईची धोंडांची जत्रा होते. गोवा, कोकणातल्या लोकमानसाला चैत्रात गुढी पाडवा साजरा केल्यानंतर या जत्रेचे वेध लागतात. इथल्या सर्वसामान्य कष्टकरी जातीजमातींत विखुरलेल्या लोकमानसाला भक्तीच्या माध्यमातून एकात्मतेच्या धाग्यात गुंफणारी ही जत्रा शिरगावात भरत असली, तरी गोवा आणि परिसराला अपूर्व अशा चैतन्याने भारून टाकते. नदीकिनारी, मंदिरा शेजारच्या परंपरेने निर्धारित केलेल्या जागेवर वैशाखाच्या पहिल्या दिवसापासून लईराई देवीचे भाविक व्रतस्थ राहतात आणि मद्य, मासे यांचे सेवन टाळून शाकाहाराचा व्रताच्या काळात मनोभावे स्वीकार करतात. घाटावरून सात बहिणी आणि त्यांचा एकुलता एक भाऊ खेतोबा ऐरावतावर स्वार होऊन मयेतल्या वण्ड्यार येथे आले आणि ठिकठिकाणी स्थायिक झाले. सात बहिणीतल्या लइराईमातेने शिरगावाच्या हिरवाईने नटलेल्या मुड्डेर येथे स्थानापन्न होण्यास प्राधान्य दिले ते मृण्मयी वारूळाच्या रुपात.

ग्रामदेवी सातेरीच्या शिरगावाला देवी लईराईच्या वास्तव्याने भक्तीचे वैभव लाभले. ‘श्रीगाम’वरून शिरगाव असे गावाचे नाव झाले. मुळगावात केळबायची पेठेची जत्रा, मयेतली माल्याची जत्रा, म्हापशातले मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त संपन्न झाल्यानंतर शिरगावात धोंडांची जत्रा भरते. गावोगावचे व्रतस्थ धोंड वैशाख वणवा पेटलेला असताना शुक्ल पक्षातल्या पंचमीच्या दिवशी शिरगावात येऊन वारूळ रूपातल्या जननीचे दर्शन घेतात आणि मध्यरात्रीला पेटलेल्या होमखंडात देवीच्या कळसाला मस्तकी धारण करून ‘मोड’ गेल्यानंतर त्याच्या निखाऱ्यावरून पाठोपाठ अग्नीदिव्याला सामोरे जातात. हातात रंगीबेरंगी गोंड्यांनी सजलेली वेतकाठी घेऊन पारंपरिक वेषातले धोंड गळ्यात मोगरीच्या कळ्यांची सुवासिक माळा परिधान करून निखाऱ्यावरून मार्गस्थ होण्याचा अनुभव घेतात. लईराईमातेचा कृपेचा वरदहस्त आपल्यावर अखंड रहावा म्हणून व्रतस्थ धोंड निखाऱ्यांवरून चालण्याचे धाडस करतात.

मोरजाई, लईराई, केळबाई, महामाया, मिराबाई, अंजादीपा, शितलादेवी अशा बहिणींना गोमंतकीय लोकमानसाने सात भगिनींच्या रूपात, तर वायंगिणीतल्या खेतोबाला त्यांच्या एकुलत्या एका भावाच्या रूपात पाहिलेले आहे. लईराई ही मृण्मयी वारूळात असली तरी लोकमानसाने तिला जीवनमुक्त कुंभाच्या रूपात पुजून स्त्रियांच्या सृजनत्वाला आणि सर्जन शक्तीला अभिवादन केलेले आहे. म्हाळसा देवी रिपुसंहारक म्हणून पर्येत वंदनीय ठरलेली आहे. गजलक्ष्मीच्या विलोभनीय रूपाला भाविकांनी केळबाई स्वरूपात पुजलेले आहे. पोर्तुगीजांच्या एकंदर धर्मांध राजवटीत केवळ माणसेच सक्तीने धर्मांतरित केलेली नसून मंदिरांच्या जागी चर्चची उभारणी केलेली आहे. म्हापसा शहरात अवर लेडी ऑफ मिलाग्रीस भाविकांत ‘मिराबाई’ म्हणून लोकप्रिय असून 

तिच्या मस्तकी खोबरेल अर्पण करण्याची परंपरा रूढ 

झालेली आहे. मयेत केळबाईच्या मंदिराशेजारी शितलादेवी असून आजारी पडलेली मुले लवकर बरी व्हावी म्हणून 

भाविक नवस करतात आणि ती रोगमुक्त झाल्यावर भिजवलेले हरभरे आणि पांढऱ्या रंगाची फुले तिला श्रद्धापूर्वक 

अर्पण करतात. लईराई देवीला देवी पार्वतीचा अवतार 

मानलेले असून हिरव्यागार वैभवाची पैदासी करणारी 

देवता म्हणून भाविक तिच्यासमोर नतमस्तक होण्यात 

धन्यता मानतात.

...............

आख्यायिका...

देवी लईराई हे नवसाला पावणारे जागृत दैवत म्हणून नावाजलेले आहे. ही जत्रा कशी सुरू झाली याबद्दल एक आख्यायिका आहे.

घाटमाथ्यावरुन ऋषीकन्या सात बहिणी व एक भाऊ साधरणत: ५०० ते ७०० वर्षांपूर्वी मये गावात आले. वण्ड्यार या ठिकाणी हत्तीची प्रतिमा पहायला मिळते. यावरुन ते हत्तीवर बसून आले असावे, असा अंदाज वर्तविला जातो. तेथे ते एक दिवस राहिले. जेवण तयार करण्यासाठी त्यांना विस्तवाची गरज भासली म्हणून त्यांनी बंधू खेतोबाला गावात जाऊन विस्तव घेऊन येण्यास सांगितले.

जेव्हा खेतोबा गावात पोहोचला तेव्हा त्याला तिथे लहान मुले खेळताना दिसली. तहान भूक विसरुन तो खेळ पहाण्यात दंग झाला. विस्तव घेऊन जायचे आहे हे तो साफ विसरला. बराच वेळ वाट पाहून देखील भाऊ आला नाही म्हणून लईराई व केळबाय त्याच्या शोधार्थ गावात गेली.

खेळ बघण्यात दंग झालेल्या भावाला पाहून लईराई भयंकर संतापली. रागाच्या भरात तिने त्याच्या कमरेवर मारण्यासाठी लाथ उगारली. आपल्यावर लाथ बसू नये म्हणून खेतोबा कमरेत वाकला तो त्याची कंबर वाकडीच राहिली. थोड्या वेळाने तिचा राग शांत झाला. भावाला त्या अवस्थेत पाहून ती फार दु:खी झाली. खेतोबाला तिने आपल्याबरोबर येण्यास सांगितले, पण त्याने येण्यास नकार दिला. लईराईला झाल्या प्रकाराबद्दल पश्चाताप झाला. ती म्हणाली विस्तवामुळे माझ्या भावावर अशी वेळ आली आहे. तेव्हा प्रायश्चित म्हणून मी स्वत: ५०० धोंडगण (भाविक) सोबत घेऊन पेटत्या होमकुंडातून चालत जाईन.

केळबायसुद्धा तिथेच होती. तिला वाटले की, आपणसुद्धा भावाची अशी अवस्था होण्यास तेवढेच कारणीभूत आहोत. हे घडत असताना आपण उघड्या डोळ्यांनी पहात राहिले. माझ्याकडून ही घोर चूक घडलेली आहे. मी सुद्धा ७०० धोंड (भाविक) सोबत घेऊन या विस्तवाला डोक्यावर खेळवीन. याचेच रुपांतर परंपरागत जत्रेत झाले.