
पणजी : गोव्यातील (Goa) एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (जीसीसीआय) (Goa Chamber of Commerce And Industry (GCCI)) एमएसएमई आधार स्तंभ विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. या विभागाचे उद्घाटन ५ मार्च रोजी उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या हस्ते होईल.
संघटनेच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मांगीरीश पै रायकर, आशुतोष खरंगटे आणि किरण बाळळीकर उपस्थित होते. प्रतिमा धोंड यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्रात एमएसएमईचा वाटा मोठा आहे. एमएसएमई अर्थव्यवस्थेला देखील चालना देत आहे.
या क्षेत्रातील उद्योगांना मार्गदर्शन करणे, त्यांना अद्यावत माहिती पुरवणे, सल्ला देणे, क्षमता विकास आदी कामांसाठी हा विभाग सुरू करण्यात येणार आहे. एमएसएमई तसेच नव्या उद्योजकांना बळकटी आणून व्यवसाय वृद्धी करण्यासाठी हा विभाग मदत करणार आहे. शाश्वत स्टार्ट अप, रोजगार निर्मितीला चालना देण्याचे काम विभाग करेल.
त्या म्हणाल्या, विभागाच्या अध्यक्षपदी मांगीरीश पै रायकर असतील. संघटनेचे अन्य पदाधिकारी देखील या विभागाला मार्गदर्शन करतील. विभागातर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्योगांना सरकारी योजनांची माहिती दिली जाईल.
एमएसएमई, सरकार, उद्योग क्षेत्रात सहकार्य करण्याचे काम विभाग करणार आहे. या विभागाची मदत मिळवण्यासाठी एमएसएमई उद्योगांना जीसीसीआयच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
व्यवसायाच्या संधी
आशुतोष खरंगटे म्हणाले की, विभागातर्फे गोव्यातील एमएसएमईतील उद्योजकांना देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवसायाच्या संधी समजावून सांगितल्या जातील. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शकांकडून माहिती दिली जाणार आहे. तसेच त्यांना या क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांची माहिती दिली जाईल.