'मेकिंग गोवा, गोवा अगेन!': विजय सरदेसाई

दाबोळी विमानतळ बंद केल्यास रस्ते आणि रेल्वे रोखण्याचा इशारा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
'मेकिंग गोवा, गोवा अगेन!': विजय सरदेसाई

मडगाव: जेव्हा गोमंतकीय जनता एकत्र येते, तेव्हाच गोव्याची ओळख आणि अस्मिता कायम राहते. गोव्याची संस्कृती, परंपरा आणि भविष्याच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येऊन 'मेकिंग गोवा, गोवा अगेन!' ही घोषणा सार्थ करण्याची वेळ आली आहे, अशी साद आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. तसेच दाबोळी विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास, दक्षिण गोव्यातील रस्ते आणि रेल्वे मार्गही रोखले जातील, असा तीव्र इशारा त्यांनी यावेळी दिला.

फातोर्डा येथे आयोजित कार्निव्हलच्या सांगता समारंभाप्रसंगी आमदार विजय सरदेसाई बोलत होते. गोव्याची अस्मिता जपण्यासाठी जनतेला साद घालताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. दाबोळी विमानतळाच्या प्रश्नावर आता 'आरपारची लढाई' लढण्याचे संकेत त्यांनी दिले. सरदेसाई म्हणाले की, गोव्याची हरवलेली ओळख पुन्हा मिळवण्यासाठी आणि गोमंतकीयांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीची गरज आहे. गोव्याला त्याचे गतवैभव मिळवून देणे ही केवळ राजकीय लढाई नसून ती अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले.

जर दाबोळी विमानतळ बंद करण्याचे षडयंत्र रचले जात असेल, तर दक्षिण गोवा शांत बसणार नाही. दाबोळी विमानतळ ही दक्षिण गोव्याची जीवनवाहिनी आहे. ती तोडण्याचा प्रयत्न झाल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना सरकारला सामोरे जावे लागेल. दाबोळी बंद झाल्यास आम्ही महामार्ग आणि रेल्वे मार्ग देखील रोखून धरू," असा इशारा त्यांनी दिला. आमच्यासाठी गोवा आणि गोमंतकीय प्रथम आहेत, हाच आमचा मूलमंत्र आहे. आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजपसह जे पक्ष जनतेच्या भावनांच्या विरोधात जात आहेत, त्यांना धडा शिकवण्याची हीच संधी आहे, असेही सरदेसाई यावेळी म्हणाले.