वेर्णा जंक्शनवर कोकाकोलाचा ट्रक उलटला; रस्त्यावर साचला हजारो बाटल्यांचा खच

वाहतूक कोंडीत अडकले चाकरमानी; काही महाभागांनी पळवल्या कोल्ड्रिंक्सच्या क्रेट्स

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
वेर्णा जंक्शनवर कोकाकोलाचा ट्रक उलटला; रस्त्यावर साचला हजारो बाटल्यांचा खच

वेर्णा: वेर्णा जंक्शनवर गुरुवारी सकाळी एका कंटेनर ट्रकचा अपघात झाल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. कोकाकोला कंपनीच्या कोल्ड्रिंक्सच्या क्रेट्सनी भरलेला हा ट्रक वेर्णा औद्योगिक वसाहतीतून बंगळुरूच्या दिशेने जात असताना जंक्शनवर नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातात कोकाकोलाच्या शेकडो क्रेट्स रस्त्यावर विखुरल्याने जिकडे तिकडे बाटल्यांचा खच पडला होता. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालाचे मोठे नुकसान झाले आहे.



अपघात सकाळी कामावर जाण्याच्या वेळी (पीक अवर्स) झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर सांडलेल्या बाटल्या आणि क्रेट्समुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मार्ग काढणे कठीण झाले होते. अनेक कार्यालयीन कर्मचारी आणि प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.




या दरम्यान, आपदा में अवसर म्हणत काही प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर पडलेले कोल्ड्रिंक्स क्रेट्स आपल्या दुचाकी आणि कारमध्ये भरून नेल्याचे संतापजनक दृश्य पाहायला मिळाले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करेपर्यंत अनेक बाटल्यांची पळवापळवी झाली होती. काही तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी रस्ता मोकळा केला आणि विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या प्रकरणी वेर्णा पोलीस अधिक तपास करत असून महामार्गावरील अशा धोकादायक वळणांवर जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण असणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. सामाजिक भान देखील राखणे गरजेचे असल्याचे एकाने म्हटले आहे. जखमी ट्रक चालकाला मदत करण्याला प्राधान्य देण्या एवजी लोकांनी बाटल्या पळवण्यावर जास्त भर दिला, हे चुकीचे आहे असे मत काही जणांनी मांडले.