अंत्रुज महालात वळवई येथे श्री सातेरीचे पुरातन मंदिर आहे. श्री सातेरीमाया स्वयंभू असल्याने वारूळाच्या रूपात ती मंदिरात विराजमान आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी, सर्व संकटांचे निवारण करणारी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करणारी, अशी तिची ख्याती आहे.

पोर्तुगीजांचे गोव्यात १५१० साली आगमन झाले. लगेच त्यांनी तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी या तीन तालुक्यांवर ताबा मिळवला. ज्यांना जुन्या काबिजादी म्हणायचे. त्या वेळचे पोर्तुगीज लोक धर्मवेडे होते. ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी वरील तीनही तालुक्यांतील हिंदू मंदिरांचा विध्वंस करून तिथे इगर्जी बांधल्या, असा उल्लेख जयवंत विनायक सूर्यराव सरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘श्री सप्तकोटीश्वर देवस्थानचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास’ या १९३४ वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकात केला आहे.
१५३५ साली दिवाडी बेटावर धर्मांतरास सुरुवात झाली. बाहेरचे मिशनरी गोव्यात येऊन दादागिरी करू लागले. जे कोणी त्यांचे ऐकत नसे, त्यांना कडक शिक्षा भोगावी लागायची. म्हणून भीतीपोटी कितीतरी लोकांनी धर्मांतर केले. उदाहरणार्थ चोडण बेटावर ऑगस्ट १५५९ ते ऑगस्ट १५६० पर्यंत एकाच वर्षात १,७१६ लोकांचे धर्मांतर केले. १५ ऑगस्ट १५६० या एकाच दिवशी दिवाडी गावात भटजींना आणि त्यांच्या बायका-मुलांना मिळून १,५०५ जणांना बाटवले आणि सप्तकोटीश्वराचे मंदिर जमीनदोस्त केले. नंतर त्याच जागेवर पाद्रीनी ‘कान्देलाहिए’ नावाचे कपेल बांधले, असा उल्लेख वरील पुस्तकात आहे.
नव्या काबिजादींचे दहा प्रांत होते. त्याचे १८५२ साली ४ घटक करण्यात आले. त्यातील तिसऱ्या घटकात अंत्रुज महालात वळवई गावाचा समावेश होतो. २० मे १८८६ या दिवशी प्रथमच देवस्थान कायदा अस्तित्वात आला. या कायद्याप्रमाणे प्रत्येक देवस्थानला धर्मसंस्थेची घटना करण्याची सक्ती करण्यात आली. त्यातूनच अंत्रुज महालात वसलेल्या वळवई गावात श्री सातेरी केळबाय रामपुरुष या देवतांची माहिती १९ व्या शतकातील उत्तरार्धात झालेल्या देवळांच्या घटनेत नोंद झालेली दिसते. ही घटना ३ ऑगस्ट १८९१ रोजी पोर्तुगीज सरकारच्या क्रमांक ४९९ राजपत्रात पहिल्या पानावर प्रकाशित झालेली आहे. घटनेत महाजन कायद्यानुसार सातेरी मंदिराची नोंद वळवई गावातील इतर दोन मंदिरांसह ‘श्री सातेरी केळबाय रामपुरुष पंचायतन’ अशी झाली आहे. श्री सातेरी ही या पंचायतनातील प्रमुख देवता आहे. या घटनेला २७ कलम असून ती ६ विभागांनी विभागली आहे.
पहिल्या विभागांत दैवतांच्या स्थापनेविषयी सविस्तर माहिती ४ कलमांतून दिलेली आहे. दुसऱ्या विभागात महाजनांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांविषयी ४ कलमांत माहिती दिलेली आहे. तिसऱ्या विभागात देवालयाच्या फंडाविषयी एकाच कलमात सांगितले आहे. चौथ्या विभागात देवळातील पूजाविधी संदर्भात ४ कलमांत माहिती दिली आहे. पाचव्या विभागात ५ कलमे असून १४ व्या कलमांत श्री सातेरीच्या देवळांत होणाऱ्या उत्सवांसंदर्भात माहिती वाचायला मिळते. १५ व्या कलमात श्री केळबायच्या देवळांत होणाऱ्या उत्सवांची माहिती दिलेली आहे. सहाव्या विभागात एकूण ९ कलमे असून देवस्थानची सर्वसाधारपणे मांडणी कशी असायला हवी, या संदर्भात सविस्तर सांगितले आहे.
सातेरी देवीचे पुरातन मंदिर अंत्रूज महालातील वळवई गावात सातेरीभाट वाड्यावर आहे. श्री सातेरीमाया स्वयंभू असल्याने वारूळाच्या रूपाने मंदिरात विराजमान झाली आहे. आदिशक्ती, आदिमाया सातेरीच्या नावावरूनच या भागाला सातेरीभाट नाव मिळाले आहे.
आख्यायिका
पूर्वी इथे घनदाट जंगल होते. गर्द झाडीत एक वारूळ होते. गावातील लोकांचा शेती प्रमुख व्यवसाय असल्याने प्रत्येकाच्या घरी गुरे होती. गुरांना चरण्यासाठी जंगलात नेले जात होते. एक गाय वासराला दूध न देता, दररोज गर्द झाडीतील वारूळाजवळ जाऊन सापाच्या रूपात असलेल्या अस्तुरेला दूध देत होती. एका ग्रामस्थाने हे दृश्य पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला. त्याने ही बातमी ग्रामस्थांना सांगितली. वाऱ्यासारखी बातमी गावभर पसरली. ग्रामस्थांनी झाडे-झुडपे कापून वारूळाभोवतीचा भाग स्वच्छ केला. तेव्हा सातेरी महामायेने सापरूपी अस्तुरेच्या रूपात ग्रामस्थांना दर्शन दिले. ग्रामस्थ भावविभोर झाले. आनंदाच्या भरातच त्या वारूळावर सुंदर देऊळरूपी झोपडी त्यांनी उभारली. तेव्हापासून श्री सातेरी महामायेला दिवा-वात लावणे चालू झाले.
१९८२ मध्ये श्री सातेरी-शांतादुर्गा देवीच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना
काही वर्षांनी झोपडीच्या जागी देऊळ बांधण्यात आले. जुन्या देवळाच्या दरवाजावर केलेल्या नोंदीनुसार देवळाचा जीर्णोद्धार १९३० साली झाला. देवळाच्या मंडपाचे काम १९२४-२५ मध्ये स्व. बाबलो नाईक, पणजी यांच्या मदतीने श्री शांतादुर्गा देवस्थान समितीने करून घेतले. पुढे श्री सातेरी शांतादुर्गा देवीची पंचलोहा चांदीची मूर्ती वारूळासमोर स्थापन करण्यात आली. वद्य षष्ठी शके १९०४, १३ जून १९८२ रोजी श्री सातेरी-शांतादुर्गा देवीच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना थाटामाटात करण्यात आली.
स्वयंभू श्री सातेरीमाया येथील ग्रामस्थांची कुलदेवता असून भक्तांच्या हाकेला धावणारी, सर्व संकटांचे निवारण करणारी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करणारी, अशी तिची ख्याती आहे. तिच्याच कृपाशीवार्दाने शांती व सुख समृद्धी नांदत आहे.
श्री गजांतलक्ष्मी (केळबाय)
वळवई गावातील दुसरे महत्त्वाचे मंदिर म्हणजे श्री गजांतलक्ष्मी (केळबाय) देवीचे. १८८० साली नैसर्गिक आपत्तीमुळे केळबायचे मंदिर जमिनदोस्त झाले. नंतर मंदिराची पुनर्बांधणी तारी समाजाकडून करण्यात आल्याचे २० ऑगस्ट १८८२ च्या सरकारी कागदपत्रातून समजते.
श्री दुर्गादेवी आणि श्री रामपुुरुष
मांडवीच्या तीरावर श्री दुर्गादेवी आणि श्री रामपुरुषाचे अतिप्राचीन मंदिर आहे. इ.स. २००९ साली या मंदिराचा जीर्णेाद्धार करण्यात आला. स्व. प्रसाद नरहरी वळवईकर यांनी आर्थिक भार उचलला होता. आज सुंदर, सुशोभित अशी श्री दुर्गादेवी-रामपुरुष मंदिराची वास्तू भाविकांचे आकर्षण ठरली आहे.
सरकार दरबारी देवस्थानाविषयी पोर्तुगीज भाषेत जी काही माहिती मिळाली, ती इतिहासाचे अभ्यासक स्व. धनंजय नावेलकर, पणजी यांच्याकडून समजून घेऊन हा थोडासा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
समस्त देवतांच्या आशीर्वादाने वळवई, सावई-वेरे भागात कला साहित्याची प्रगती झाली आहे. समाजरचनेला एकसूत्रात बांधण्याचे काम धार्मिक संस्थांनी केले आहे. पूर्वीच्या काळात या गावात चांगले कलाकार, व्यापारी होते, तर आताच्या काळात चांगले डॉक्टर, इंजिनियर, कायदे पंडित, सरकारी अधिकारी, कवी, कलाकार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारी संस्था आहे. या सर्वसंपन्न घटनेच्या मागे ग्रामदेवता आहे, यात तीळमात्र शंका नाही.
सुभाष दशरथ नाईक
अध्यक्ष, श्री सातेरी -शांतादुर्गा देवस्थान समिती