म्हार्दोळ (फोंडा) येथील श्री महालसा देवी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गोमंतकात ही देवी कशी आली ? देवीचे मंदिर कुठे होते ? तेथून ती म्हार्दोळात का आणि कशी आली ? मंदिराची रचना, देवीची मूर्ती, मंदिरात साजरे होणारे उत्सव याविषयी...

श्री महालसा नारायणी देवस्थान फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ गावात वसलेले आहे. हे मंदिर गोव्याची राजधानी पणजीहून दक्षिणेला २१ किलोमीटर अंतरावर, तर मडगावहून उत्तरेला २४ किलोमीटर अंतरावर आहे.
आख्यायिका
श्री महालसा देवीच्या गोमंतकातील आगमनाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. प्राचीन काळी वेर्णा भागात घनदाट जंगल होते. तेथे एक गुराखी आपल्या गुरांना चरण्यासाठी घेऊन आला होता. जवळपास पाणी नसल्याने तो पाण्याच्या शोधात फिरू लागला. डोंगरावरून खाली उतरताच त्याला तेजःपुंज स्त्री दिसली. त्याला समजेना अशा निर्मनुष्य ठिकाणी ही स्त्री आली कुठून ? तिचे मंजुळ बोलणे त्याला स्तब्ध करून गेले. ती म्हणाली, मला याच जागी वास्तव्य करायचे आहे. या जमिनीचा मालक कोण आहे, त्याला बोलावून आण. गुराख्याने आपण जनावरांसाठी पाण्याच्या शोधात असल्याचे सांगितले. त्यावर त्या स्त्रीने खडकाळ जमिनीवर टाच मारली, तर तेथून स्वच्छ पाण्याचा झरा वाहू लागला. तुझ्या जनावरांना येथे घेऊन ये आणि हे पाणी पाज. तोपर्यंत तू जमीन मालकाला बोलावून आण. त्याप्रमाणे तो डोंगर उतरून गावात गेला. जमीनमालक घरी नव्हते. त्यांचे जावई घरी होते. गुराख्याने जावयाला आपल्यासोबत येण्याची विनंती केली. जावयाने प्रत्यक्ष येऊन त्या स्त्रीचे म्हणणे ऐकले. याच जागी आपले मंदिर बांधा, मी येथेच राहणार आहे, असे सांगून ती स्त्री अंतर्धान पावली. त्यानंतर ग्रामस्थांनी वेर्णा येथे श्री महालसा देवीचे मंदिर बांधले.
गोव्यात पोर्तुगीज येण्यापूर्वी खूप वर्षांपासून श्री महालसा देवीचे मंदिर सासष्टी तालुक्यातील वेर्णा येथे होते. त्या भागाला वरेण्यपूर किंवा वरुणापूर म्हणून ओळखले जायचे. स्कंद पुराणात वरुणपूर येथील श्री महालसा याविषयी दोन अध्याय आहेत. देवीची कृपादृष्टी राहावी यासाठी येथे ज्योतिस्तोम यज्ञ करण्यात आला होता. त्यावेळी भगवान परशुराम उपस्थित होते. त्यांनी भाविकांना येथे मंदिर बांधण्याची आज्ञा केली. त्यानंतर तेथे सुंदर आणि भव्य असे श्री महालसाचे मंदिर उभारण्यात आले. मंदिर पाहून भगवान परशुराम आनंदी झाले. त्यांनीच या भागाचे नाव ‘वरुणापूर’ ठेवले.
वैशाख शुद्ध नवमी या दिवशी वरुणापूरचे भाविक भगवान परशुराम यांचा उत्सव साजरा करत होते. त्यावेळी ‘चंडासुर’ नावाचा राक्षस प्रगट झाला. त्याने भाविकांना त्रास देणे सुरू केले. त्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी भाविकांनी पुन्हा भगवान परशुरामांचा धावा केला. भगवान परशुराम प्रगट झाले. त्यांनी भाविकांना सांगितले, मंदिरात प्रतिष्ठापित झालेली देवीच तुमचे रक्षण करेल. तिची मनोभावे पूजा करा. तिला आर्ततेने आळवा. त्यानुसार भाविकांनी देवीची मनोभावे आराधना सुरू केली. प्रसन्न होऊन देवीने ‘चंडासुरा’चा वध केला. त्याचे छाटलेले मुंडके डाव्या हातात धरून देवीने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. युद्धातील देवीच्या विजयाचा भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. तो दिवस होता माघ षष्ठीचा. तेव्हापासून दरवर्षी मंदिरात माघ षष्ठीला विजयोत्सव साजरा केला जातो.
मूर्तीचे म्हार्दोळात आगमन
पोर्तुगीज राजवटीत हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याला ऊत आला होता. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे उद् ध्वस्त केली जात होती. त्याच काळात १५४३ च्या आसपास वेर्णातील भाविकांनी श्री महालसा देवीच्या मूर्तीचे फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ येथे स्थलांतर केले. हे काम अत्यंत गोपनीयरीत्या पार पाडण्यात आले. म्हार्दोळमधील जमीनदार रामचंद्र मल्हार सुखटणकर यांनी आपली जमीन देवीचे मंदिर बांधण्यासाठी दिली. हे मंदिर केव्हा बांधले याचे निश्चित पुरावे नसले तरी मंदिराचा पहिला जीर्णोद्धार १७८९ मध्ये झाल्याची नोंद आहे.
मूर्तीविज्ञान
मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या श्री महालसेच्या मूर्तीला चार हात असून ती उभी आहे. तिने पायाखाली ‘राहू’ राक्षसाला तुडवले आहे. राक्षसाचे तोंड देवीच्या उजव्या बाजूला आहे. देवीने समोरील उजव्या हातात गुडघ्यावर बसलेल्या विरोचना राक्षसाचे केस पकडले आहेत. समोरील डाव्या हातात तिने चंडासुर राक्षचाचे छाटलेले मुंडके धरले आहे. मागील बाजूच्या उजव्या हातात तिने त्रिशूळ, तर मागील बाजूच्या डाव्या हातात तिने अमृतकुंभ धरला आहे. देवीच्या उजव्या हाताला वाघासारखा प्राणी रक्तप्राशन करत बसला आहे.
मंदिराच्या आवारात पंचलोहा धातूचा ३६.६ फूट उंचीचा दीपस्तंभ आहे. मंदिरात उजव्या बाजूला श्री सातेरी पंचिष्ठ - श्री गणपती, श्री लक्ष्मी नारायण, श्री ग्रामपुरुष, श्री भगवती व श्री संहारभैरव यांचे मंदिर आहे. दोन्ही देवतांची मिरवणूक निघते, तेव्हाही श्री सातेरीचे स्थान श्री महालसा देवीच्या उजव्या बाजूला असते. श्री महालसेने तिला अग्रपूजेचा मान दिला आहे. मंदिरात डाव्या बाजूला श्री महालसा पंचिष्ठ - श्री चतुषष्ठी, श्री कालभैरव, श्री दाढ, श्री मल्हार व श्री सिंहपुरुष यांचे छोटेसे मंदिर आहे. श्री सिंहपुरुष हा काही महाजन, कुळावी यांचा कुलपुरुष आहे.
मंदिरातील उत्सव
मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात. नवरात्रीत नऊ दिवस रात्री मखरोत्सव साजरा केला जातो. अश्विन पौर्णिमेला रात्री कौलास प्रारंभ होतो. अश्विन वद्य पंचमीला कौलाची समाप्ती होते. माघ वद्य चतुर्थी ते दशमी या काळात मंदिराचा मुख्य जत्रोत्सव साजरा केला जातो. या काळात श्री महालसा आणि श्री सातेरी यांची दररोज वेगवेगळ्या वाहनांतून मिरवणूक काढली जाते. कार्तिक पौर्णिमेचा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी लक्ष दीपोत्सव होतो. शिवरात्रीही मंदिरात उत्साहात साजरी होते. रात्री चौथ्या प्रहराच्या अभिषेकानंतर देवीच्या मुखवट्यावर सुवर्णमुख चढवला जातो.
(माहिती संग्रहित)