मंदिरात सुप्रतिष्ठित असलेली मूर्ती उभी श्री देवकी असून तिच्या हातात श्री कृष्णाची मूर्ती अाहे. शिबिकोत्सवात बालकृष्ण माता श्री देवकीच्या कडेवर बसतो, तर रथात एकटाच बसतो. रथात बसणारी मूर्ती श्यामवर्णी, तुलसी काष्ठाची असून मोहक अाणि गोजिरवाणी अाहे.

गोमंतकाच्या चतु:सीमा, क्षेत्रफळ अाणि हिंदूंची लोकसंख्या लक्षात घेता, तसेच देव अाणि देवस्थाने यांच्या संख्येचा विचार करता या भूमीस ‘देवभूमी’ हे सार्थ नाव अाहे. पुण्यक्षेत्र, महाशैल येथे गोमंतकातील कुठल्याही गावापेक्षा जास्त संख्येने देवतांचे वास्तव्य अाढळते. तेथेच श्री देवकीकृष्ण मंदिरही आहे.
पोर्तुगीजांनी गोव्यात हिंदूंचे ख्रिस्तीकरण करण्याचे सत्र अारंभले होते. देवालयांचा विध्वंस, मूर्ती फोडणे, हिंदूंना बळजबरीने बाटविणे, असा छळ सुरू झाला. सरकारी बळापुढे टिकाव धरणे अशक्य झाले, म्हणून गुपचूप काळोख्या रात्री अापले दैवत, प्रमुख मूर्ती किंवा दैवताचे प्रतीक वस्त्रात लपवून नद्या, डोंगर, जंगलातून वाट काढत पोर्तुगीज हद्दीबाहेरच्या राज्यात जाऊन तेथे अापले दैवत स्थापून धर्म वाचविण्याचे पूर्वजांनी महान दिव्य केले. चुडामणी (चोडण) बेटावर ख्रिस्तीकरणाचा सुगावा लागताच पूर्वजांनी देवतांच्या मूर्ती अाणि प्रतिके डिचोली भतग्राम येथील मये गावात नेल्या. तेथे गुपचूप स्थापना केली. नंतर मये येथूनही स्थलांतर करून मूर्ती श्रीक्षेत्र माशेलात अाणण्यात आली. ही घटना इ. स. १५४० नंतर अाणि इ. स. १५६७ पर्यंतच्या काळात घडली असावी.
श्री क्षेत्र माशेलात देवकी-कृष्ण देवतेची स्थापना करण्यात आली. गर्भगारात सुप्रतिष्ठित असलेली मूर्ती उभी श्री देवकी असून तिच्या हातात श्री कृष्णाची मूर्ती अाहे. देवस्थानात प्रमुख दैवत श्री देवकीकृष्ण अाहे. त्याच्या उजव्या बाजूकडे श्री रवळनाथ-पांडववाडा (पिसो रवळू) देव असून डाव्या बाजूकडे श्री लक्ष्मी रवळनाथ गावणवाडा (शाणो रवळू) या नावांचे दैवत अाहे. देवस्थानात अनुषंगिक दैवते पुढील प्रमाणे : १. श्री लक्ष्मीनारायण, २. श्री कात्यायनी, ३. श्री चोडणेश्वर, ४. श्री महादेव, ५. श्री. भूमिका, ६. श्री दाडसांकळ, ७. श्री ब्राह्मण.
दीपस्तंभ
पांडववाड्याच्या सीमेपासून थोड्या अंतरावर रवळनाथाचे मंदिर होते. त्याचा पायाच काहीसा शिल्लक असला तरी त्या काळी देवालयासमोर असलेला दीपस्तंभ मात्र अद्याप उभा अाहे. याचे कारण त्या दीपस्तंभाजवळ एक वृक्ष अाहे. त्याच्या पाळामुळांनी तो स्तंभ घट्टपणे अावळला गेला अाहे. अशाच प्रकारचा दीपस्तंभ माशेलात श्री रवळनाथ (श्री पिसो रवळू) देवालयाच्या डाव्या बाजूकडे अाहे. त्या दीपस्तंभाचे अद्यापही धार्मिकरीत्या उद्दीपन केलेले नाही. वाडे- मये गावात श्री रवळनाथ देवालयासमोर असलेला दीपस्तंभ उभा अाहे, तोपर्यंत माशेलात श्री रवळनाथाच्या देवळासमोर बांधलेल्या दीपस्तंभाचे उद्दीपन केले जाणार नाही. जुन्या स्तंभाचे उद्यापन न झाल्यामुळे प्रतिवर्षी जत्रोत्सवाच्या वेळी या दीपस्तंभावर दिवे किंवा पणत्या पेटवून दीपस्तंभ प्रज्वलीत करत नाहीत.
शिबिकोत्सव
गोमंतकात श्री देवकीकृष्ण देवतेचे एकमेव देवस्थान अाहे. श्रीकृष्ण अापल्या बालवयात श्री देवकीमातेच्या कडेवर बसलेला दिसतो. शिबिकोत्सवात बालकृष्ण अापल्या मातेच्या, श्री देवकीच्या कडेवर बसतो, तर रथात तो एकटाच बसतो. रथात बसणारी मूर्ती श्यामवर्णी, तुलसी काष्ठाची असून ती मोहक अाणि गोजिरवाणी अाहे. श्री देवकीकृष्णाची प्रतिवार्षिक जत्रा मार्गशीर्ष महिन्यांत शुक्ल त्रयोदशी तिथीस होते. वर्षात चतुर्मास वगळता पाक्षिक नियमित शिबिकोत्सव होत असतो. तोही प्रत्येक त्रयोदशी तिथी दिवशी.
दहीकाला, गवळणकाला
दहीकाला अाणि गवळणकाला हे खास उत्सव श्री देवकीकृष्ण देवतेच्या बालवयाशी निगडित असलेले उत्सव. त्यातही बाल श्रीकृष्णाचा उत्सव म्हणजे दहीकाला. माशेलात काल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी अाणि सेवेकऱ्यांनी अाणलेल्या पोह्यात दही कालवून त्याचे लाडू (गोळे) सर्वांना वाटतात अाणि संध्याकाळी गवळणकाला होत असतो. तो श्रीकृष्णाच्या बाललीलांवर अाधारित असतो.
साजरे केले जाणारे प्रमुख उत्सव
रामनवमी उत्सव : हा उत्सव चैत्र शु. प्रतिपदा ते चैत्र शु. दशमीपर्यंत होतो. उत्सवकाळात चैत्र शु. प्रतिपदा (गुढीपाडा) ते सप्तमीपर्यंत रोज सकाळी अभिषेक व अष्टमीपर्यंत रोज रात्री श्री देवकीकृष्णास रंगपूजा होते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सत्यनारायण पूजा असते. रात्री ८ वा. दोन्ही रवळनाथ मंदिरात पंचाग वाचन होते व सायंकाळी श्री देवकीकृष्ण शिबिकोत्सव असतो.
चैत्र शुद्ध अष्टमी ते दशमी या दिवशी रथानुष्ठान असते. चैत्र शु. अष्टमीच्या दिवशी पुण्याहवाचन असते. नंतर विधीवत् ‘श्रीं’चा यज्ञमंडपात प्रवेश होऊन रथानुष्ठानास प्रारंभ होतो.
चैत्र शुद्ध नवमीस/रामनवमी दिवशी सकाळी ८.३० वा. द्वादश कलशार्चन होते. नित्यनैवेद्य व महाअारती झाल्यावर ‘श्रीं’चे पालखीतून यज्ञमंडपात अागमन होते. दुपारी १२ वा. रामजन्मोत्सव होतो. त्यानंतर रामरथोत्सव होऊन महासंतर्पण होते. सायंकाळी ७ वा. ‘श्रीं’चा महारथ श्रीकृष्ण मंदिरासमोर अाणला जातो. चैत्र शुद्ध दशमीस अष्टावधान सेवा असते. नंतर ‘श्रीं’चा गर्भगृहात प्रवेश होतो. पूजा-अर्चा, नैवेद्य, अारती, निर्माल्य विसर्जन, दंडबळी अादी विधी होतात. नंतर पालखीतून ‘श्रीं’चा यज्ञमंडपात प्रवेश होतो. मग पूर्णाहुती व गुलालोत्सव होतो व पालखीतून ‘श्रीं’चा श्री मल्लिनाथ मंदिरात प्रवेश होतो. तिथे अवभृतस्नान, कंकणबंधन विसर्जन, अारती, फराळ इ. झाल्यावर ‘श्रीं’ची पालखी श्रीदेवकीकृष्ण मंदिरात प्रवेश करते. नंतर होणाऱ्या महापूजा, महाअारती, महानैवेद्य व महासंतर्पणानंतर अाशीर्वाद विधी झाल्यावर श्रीरामनवमी उत्सवाची सांगता होते.
वैशाख शु. तृतीया : अक्षय तृतीया - सकाळी अभिषेक होतो नंतर लघुविष्णू, महापूजा व अारती होते. रात्री ८.३० वा. पुराण वाचन व नंतर श्री देवकीकृष्णाची पालखीतून मिरवणूक निघते. नंतर वसंतपूजा होते. अारती व फराळ असा कार्यक्रम असतो.
श्रावण कृ. अष्टमी : श्रीकृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी - सकाळी महाभिषेक होतो. सकाळी १० वा. श्री देवकीकृष्णाचे पालखीतून कुंभारजुवे तारीवर तीर्थस्थानासाठी प्रयाण होते. तिथे पूजा, यज्ञोपवीत विसर्जन कार्यक्रम होतो. रात्री ९.३० वा महाभिषेक व त्यानंतर अलंकारपूजा होते. गर्भगृहातील श्री देवकीकृष्ण मूर्तीवर व इतर भाविकांतर्फे चौकावर ठेवलेल्या श्री देवकीकृष्ण उत्सवमूर्ती व गोकुळावर विष्णुसहस्त्रनामावलीच्या उद्घोषांत सहस्त्र तुलसीदल अर्पणाचा कार्यक्रम होतो. नंतर श्री देवकीकृष्णाची महापूजा व महाअारती होते. यादिवशी पोह्यांचा नैवेद्य दाखविला जातो.
दुसरे दिवशी पहाटे गोपाळकाला साजरा केला जातो. संध्याकाळी ६ वा. श्रीदेवकीकृष्ण मंदिरासमोरील पटांगणात संस्थानातर्फे दहीहंडी फोडण्याची स्पर्धा अायोजित केली जाते.
अश्विन शु. दशमी (विजयादशमी) : या दिवशी सायंकाळी ५ वा. तरंगपूजा, श्री रवळनाथदर्शन इत्यादी झाल्यावर श्री देवकीकृष्णाचे रौप्यशिबिकेतून चिरेखण येथे देवस्थानच्या बागायतीत सीमोल्लंघनासाठी प्रयाण होते. तेथे पालखीची पूजा, तरंगाची पूजा, तसेच शमी व अापटा यांच्या कलमांची पूजा होते. अाशीर्वाद व प्रसाद वितरण झाल्यावर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. तरंगासमोर कोहळा कापून तरंगाची भोगावळ करण्यात येते. तरंगासह पालखी श्री देवकीकृष्ण मंदिराकडे अाल्यावर श्री पांडववाडा, रवळनाथाची तरंगे, श्री दाडसांकळ देवळासमोर व गाववाडा रवळनाथाची तरंगे श्री भूमिका देवीच्या देवळासमोर उभी राहतात. गावणवाडा रवळनाथाची तरंगे देवळाच्या तुलसी वृंदावनाजवळ उभी राहतात. यानंतर दोन्ही रवळनाथांची तरंगे श्री देवकीकृष्ण मंदिरासमोर एकत्रपणे उभी राहतात. दोन्ही रवळनाथांची तरंगे श्री भूमिका देवीच्या मंदिरासमोर एकत्र उभी राहतात. यानंतर गावणवाडा रवळनाथाची तरंगे अापल्या देवस्थानात व पांडववाडा रवळनाथाची तरंगे श्री लक्ष्मीनारायण, श्री कात्यायनी देवळासमोर येऊन त्या देवस्थानाचे पुजाऱ्यास व तिथे उपस्थित भाविकांना कौलप्रसाद देतात. तेथून तरंगे श्री पांडववाडा रवळनाथ देवालयाच्या बाजूस असलेल्या नायक यांच्या घरी पाहुणचारास जातात. तिथे महानैव्द्य होतो. त्याचदिवशी श्रीदेवकीकृष्ण, श्री मल्लिनाथ व दांडसाकळ देवास रंगपूजा बांधण्यात येते.
दुसऱ्या दिवसापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत दोन्ही रवळनाथांची तरंगे अापअापल्या देवालयासमोर संध्याकाळी ६.३० वा. उभी राहिल्यावर गोत्रानुसार त्रयोदशीपर्यंत व पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी उत्सव झाल्यानंतर सर्व भाविकांना देवाचा कौल देण्यात येतो.
विजयादशमी ते पौर्णिमा ह्या काळांत श्री देवकीकृष्णास रंगपूजा असते.
कार्तिक शु. प्रतिपदा : बलीप्रतिपदा गोक्रिडनोत्सव (धेंडलो पाडवो) हा उत्सव देवस्थानचे सर्व सेवेकऱ्यांमार्फत साजरा केला जातो. सकाळी अभिषेक होतोे. नंतर १० वाजता श्रीकृष्णाची उत्सवमूर्ती खांद्यावरील रथांत बसवून सर्व पंचिष्ट देवतांना भेट देऊन माशेल गावात घरोघरी तो रथ फिरविण्यात येतो.
नंतर ‘श्रीं’ची स्वारी मल्लिनाथ मंदिरात स्थानापन्न होते. संध्याकाळी हा रथ श्रीदेवकीकृष्ण मंदिरासमोरील पटांगणात नाचवत, वाजत गाजत अाणला जातो. रात्री ८.३० वाजता लालखोत्सव होतो.
कार्तिक शु. द्वितीया : सुखासनोत्सव : या दिवशी रात्री ८.३० वाजता श्रीदेवकीकृष्णाची पालखीतून मिरवणूक काढली जाते.