म्हणाले-मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल

मडगाव : साळ नदीच्या स्वच्छतेसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला असून, तो पुढील दोन दिवसांत सरकारला सादर केला जाईल. या अहवालाला मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून 'वर्क ऑर्डर' काढली जाईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिली.
खारेबांध-मडगाव येथील विविध विकासकामांचा शुभारंभ मंत्री कामत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक महेश आमोणकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. खारेबांध परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना सांडपाण्यासाठी गटारांची निर्मिती केली जाणार आहे. या कामासाठी मडगाव पालिकेच्या निधीतून सुमारे साडेबारा लाख रुपये खर्च केले जाणार असल्याची माहितीही मंत्री कामत यांनी दिली. तसेच कोंब परिसरातही लवकरच गटारांच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साळ नदीच्या प्रदूषणाबाबत आणि स्वच्छतेबाबत बोलताना मंत्री कामत म्हणाले की, "साळ नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे. नदी स्वच्छतेचा सविस्तर अहवाल तयार झाला असून, सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया जलदगतीने राबवली जाईल." याशिवाय साळ नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम जलस्रोत विभागाकडून (WRD) पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.