पालकांचा टाहो आणि पोलिसांची मोठी धावपळ;; नागपुरातील घटना.

नागपूर: नागपूर जिल्ह्याील खापरखेडा परिसरातून प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस गाठणारी एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. खेळता खेळता अंगणवाडीच्या दुसऱ्या खोलीत गेलेला एक चार वर्षांचा चिमुकला कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे रात्रभर शाळेतच कोंडला गेला. शाळा सुटताना वर्गखोल्यांची साधी तपासणी न करताच कर्मचाऱ्याने बाहेरून कुलूप ठोकल्याने हा धक्कादायक प्रकार घडला. मुलाच्या गायब होण्यामुळे संपूर्ण परिसरात अपहरणाची चर्चा पसरली होती, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा पोलीस आणि पालकांच्या काळजाचा ठोका चुकला.
ही घटना खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरकर लेआऊट परिसरातील एका अंगणवाडीत घडली. बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी हा चिमुकला नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेला होता. खेळता खेळता तो मागील बाजूच्या एका खोलीत शिरला आणि तिथेच त्याला गाढ झोप लागली. संध्याकाळी शाळा सुटण्याची वेळ झाली तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्याने खोलीत कोणी आहे की नाही, याची खातरजमा न करताच बाहेरून कुलूप लावले आणि तो घरी निघून गेला. इकडे संध्याकाळ झाली तरी मुलगा घरी न परतल्याने पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली, नातेवाईकांकडे विचारणा केली, पण मुलाचा कुठेच पत्ता लागला नाही.
मुलाचा शोध लागत नसल्याने घाबरलेल्या पालकांनी तातडीने खापरखेडा पोलीस स्टेशन गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत तपासासाठी सात विशेष पथके तैनात केली. रात्रभर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, विहिरी, तलाव आणि नाले पिंजून काढले. रात्रभर शोध घेऊनही मुलाचा काहीच सुगावा लागत नसल्याने आई-वडिलांचा रडून रडून हाल झाला होता. संपूर्ण रात्र पोलीस आणि नातेवाईक चिंतेत होते.
दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी तपासाची दिशा बदलत स्वतः अंगणवाडीची पुन्हा एकदा सखोल पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अंगणवाडीचे कुलूप उघडण्यास सांगितले. जसेही कुलूप उघडले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. तो चिमुकला त्याच खोलीत सुरक्षित बसलेला होता. रात्रभर अंधारात आणि एकट्याला त्या खोलीत राहावे लागल्याने तो घाबरलेला होता. आपल्या मुलाला सुखरूप पाहताच आईने मोठा हंबरडा फोडला आणि त्याला काळजाशी धरले.
या प्रकरणाने शाळा आणि अंगणवाडी प्रशासनातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या गंभीर हलगर्जीपणाबद्दल संबंधित कर्मचाऱ्याला आणि प्रशासनाला कडक समज दिली आहे. शाळा बंद करताना प्रत्येक कोपऱ्याची तपासणी करणे हे कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करत पोलिसांनी असा प्रकार पुन्हा घडल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सुदैवाने या घटनेत मुलाला कोणतीही इजा झाली नाही, मात्र प्रशासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे एका कुटुंबाला आणि चिमुकल्याला ज्या मानसिक त्रासातून जावे लागले, त्याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.