पणजी कार्निव्हल चित्ररथ स्पर्धेचा निकाल चुकीचा ?

फ्लोट मेकर्स समितीने केला राजकीय हस्तक्षेपाचा आरोप

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
पणजी कार्निव्हल चित्ररथ स्पर्धेचा निकाल चुकीचा ?

मडगाव: पर्यटन खात्यातर्फे पणजीत आयोजित कार्निव्हल मिरवणुकीत सहभागी चित्ररथ आणि कलाकारांची मोठी गैरसोय झाली. सकाळी ११ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत चित्ररथांना ताटकळत ठेवण्यात आले. चित्ररथांचे योग्य परीक्षण न झाल्याने पारंपारिक चित्ररथांवर अन्याय झाला असून, यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप ‘गोवा कार्निव्हल फ्लोट मेकर्स समिती’ने केला आहे.

मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत राहुल परेरा, अ‍ॅड्रियन फर्नांडिस आणि अन्य पारंपरिक चित्ररथ कलाकारांनी पर्यटन खात्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल परेरा म्हणाले की, गेल्या २७ वर्षांपासून मी पारंपारिक चित्ररथ तयार करत असून दरवर्षी आम्हाला पारितोषिके मिळतात. यंदा कुडतरी आणि कुडचडे येथील खाजगी कार्निव्हलमध्ये आम्हाला बक्षिसे मिळाली, मात्र पर्यटन खात्याच्या पणजी येथील मिरवणुकीत निकालात फेरफार झाल्याचे संशय येतो. चित्ररथ मिरवणुकीदरम्यान पर्यटन खात्याने लावलेल्या मोठ्या संगीतामुळे चित्ररथांचे संगीत ऐकू येत नव्हते. तसेच, परीक्षकांचेही कलेकडे पूर्णतः दुर्लक्ष होते, असा आरोप त्यांनी केला. पर्यटन मंत्री आणि खात्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे ते म्हणाले.

अ‍ॅड्रियन यांनी सांगितले की, पणजीत सकाळी ११ वाजता नोंदणी सक्तीची केली होती. सायंकाळी साडेतीनची मिरवणूक साडेपाच वाजता सुरू झाली आणि रात्री साडेअकरा वाजता संपली. या प्रदीर्घ काळात कलाकारांच्या खाण्यापिण्याचे प्रचंड हाल झाले. मिरवणूक विलंबाने सुरू झाल्यामुळे आणि चित्ररथांची संख्या जास्त असल्याने कलाकारांना घाईघाईत पुढे जाण्यास सांगण्यात येत होते, परिणामी कला सादर करण्याची संधीच हिरावली गेली. चित्ररथांसाठी कलाकार स्वतःचे पैसे खर्च करतात, त्यामुळे बक्षीस न मिळाल्यास किमान ठराविक मानधन मिळणे आवश्यक आहे. परीक्षक राज्याबाहेरील असल्याने त्यांना गोव्याच्या मूळ कलेची जाण नव्हती, तसेच चित्ररथांच्या गटांमध्येही मोठा गोंधळ होता, असे त्यांनी नमूद केले.

निकालात राजकीय हस्तक्षेप असून नियमात न बसणाऱ्या चित्ररथांना बक्षिसे देणे हे पर्यटन खात्याचे अपयश असल्याचे राहुल परेरा यांनी सांगितले. अशा अन्यायामुळे पुढील वर्षी सरकारी मिरवणुकीत सहभागी न होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 'गोवा कार्निव्हल फ्लोट मेकर्स समिती'ची रीतसर नोंदणी करून सरकारला याबाबत जाब विचारण्यात येईल, असेही समितीने स्पष्ट केले आहे.