'...येथे कोणी 'हेव्हीवेट' नाही; 'लोकांसाठी काम करणाराच जिंकणार' : उदय मडकईकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल

पणजी: पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनेलने आज आपले शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे पाऊल ठेवले. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी या पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी पणजीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर महापौर रोहित मोन्सेरात यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या राजकीय घडामोडींदरम्यान, माजी महापौर उदय मडकईकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. पत्रकारांनी त्यांना निवडणुकीतील चुरस आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या 'हेव्हीवेट' असण्याबाबत विचारले असता, मडकईकर यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले की, "या निवडणुकीत कोणीही हेव्हीवेट किंवा वरचढ नाही. राजकारणात केवळ नावाचे वजन कामाला येत नाही, तर ज्या उमेदवाराने गेल्या पाच वर्षांत प्रत्यक्ष जमिनीवर उतरून प्रभागातील लोकांची कामे केली आहेत आणि जो जनतेच्या सुख-दुखात धावून गेला आहे, तोच यंदाच्या निवडणुकीत विजयी होईल. लोकांचा विश्वास केवळ कामावर असतो आणि आमचा तोच मुख्य आधार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना मडकईकर यांनी कॅसिनोच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, शहरात कॅसिनो बाबुश मोन्सेरात किंवा रोहित मोन्सेरात यांनी आणलेले नाहीत. कॅसिनो शहरात नकोत म्हणूनच बाबुश आणि मी स्वतः अनेकदा प्रखर विरोध दर्शवला आहे. मात्र, आता त्यांची पाळेमुळे खूप खोलवर गेली आहेत, हे वास्तव स्वीकारावे लागेल. मुळात महानगरपालिकेचे अधिकार काय आहेत, हे समजून घेतले पाहिजे. महापालिकेचे काम फक्त व्यापारी परवाने (Trade Licenses) देण्याचे असते. कॅसिनो हटवणे किंवा ठेवणे हे केवळ पालिकेच्या हातात नसते. विरोधक या विषयाचे राजकारण करत असले, तरी त्यांच्याकडे विकासकामांवर बोलण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे नाहीत.
मडकईकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, विरोधकांकडे सध्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध कोणताही प्रभावी मुद्दा उरलेला नाही, म्हणून ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पणजीतील स्मार्ट सिटीची कामे आणि इतर पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवर विचारले असता त्यांनी नमूद केले की, विकासकामे करताना काही काळ त्रास होतो, मात्र अंतिम फायदा जनतेचाच असतो. आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील या पॅनेलमध्ये जुन्या अनुभवी चेहऱ्यांसोबतच नवीन उमेदवारांना संधी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम मानली जात असल्याने बाबुश मोन्सेरात यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.