हडफडेत ‘रेन्ट अ बाईक’ व्यावसायिकाला मारहाण

यवतमाळच्या पर्यटकाला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
45 mins ago
हडफडेत ‘रेन्ट अ बाईक’ व्यावसायिकाला मारहाण

म्हापसा : भाड्याने घेतलेली दुचाकी उशिरा परत दिल्याचा जाब विचारल्याच्या मुद्द्यावरून रेन्ट अ बाईक व्यावसायिकालाच मारहाण करण्याचा प्रकार हडफडे येथे घडला. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी अमित दीपक काळे (३०, रा. यवतमाळ) या महाराष्ट्रातील पर्यटकाला अटक केली.

ही घटना गुरुवारी सकाळी १०.२० वा. सुमारास हडफडे येथील ला सुनिला रिसॉर्टजवळ घडली. याप्रकरणी गुरूदास दिवकर (साकवाडी, हडफडे) यांनी पोलिसांत तक्रार दिली.

फिर्यादींनी पर्यटकाला बुधवार, दि. १८ रोजी आपली रेन्ट अ बाईक भाड्याने दिली होती. ही दुचाकी संशयिताने दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ९ वा. अगोदर परत करण्याचे ठरले होते. मात्र, संशयित हा सकाळी १०.२० वाजता दुचाकी परत करायला फिर्यादींच्या आस्थापनावर आला.

दुचाकी उशीरा आणल्याबद्दल फिर्यादीने संशयिताला जाब विचारला असता त्यांच्यात वादावादी झाली. नंतर संशयिताने हेल्मेट व ठोशाने दिवकर यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

हा प्रकार निदर्शनास येताच इतर व्यावसायिक व शेजाऱ्यांनी संशयिताच्या तावडीतून दिवकर यांची सुटका केली. मध्यरात्री संशयिताविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदवून हणजूण पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईश शेटगावकर हे करत आहेत. 

हेही वाचा