
म्हापसा : वागातोर येथील अलबेली रेस्टॉरन्टला शार्टसर्किटमुळे आग लागून सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने घटनेवेळी हे रेस्टॉरन्ट बंद असल्यामुळे कोणालाही इजा पोहोचली नाही.
ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी २.४० वा. सुमारास घडली. एकमजली या रेस्टॉरन्टच्या पहिल्या मजल्यावर वीज उपकरणांमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग भडकली. रेस्टॉरन्टमधील कर्मचारी व म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली गेली.
आगीत रेस्टॉरन्टमधील खुर्च्या, छतावरील सजावटीचे झुंबर, कापडी पडदे, छताचे प्लास्टिक पत्रे जळाले. यात रेस्टॉरन्टचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले.
म्हापसा अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी गणेश गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली शैलेश तारी, स्वप्नेश कळंगुटकर, संजीवन कोरगावकर, लविंदर साळगावकर, सिद्धेश शेट व तेजस बांदेकर या जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. हणजूण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊळ यांनी सहकाऱ्यांसह घटनेचा पंचनामा केला.