
म्हापसा : बागा येथील एका रेस्टॉरन्टमध्ये जेवायला गेलेल्या गुजरातमधील ग्राहकाच्या बॅगेतील ७३ हजार वेटरनेच पळवले. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयित वेटर प्रल्हाद चंद्रकांत परब (रा. सुंदर नगरी, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नोकरीच्या पहिल्याच दिवशी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
ही चोरीची घटना बुधवार, १८ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी केशू अगथ (रा. गुजरात) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र हे गोव्यात पर्यटनासाठी आले होते. घटनेच्यावेळी ते बागा येथील कृष्णा काठियावाडी किचन या रेस्टॉरन्टमध्ये जेवायला गेले होते. जेवण उरकून हात धुवायला वॉश बेशीनमध्ये ते गेले. त्यावेळी त्यांनी आपली पैसे असलेली बॅग खुर्चीवरच ठेवली होती. ही बॅग संशयित वेटरने चोरली आणि आतील ७३ हजार ५०० रुपये रक्कम काढून ती बॅग रेस्टॉरन्टच्या स्वयंपाक खोलीत टाकली आणि त्याने आपली बॅग घेत पलायन केले.
हात धुवून टेबलवर आल्यावर खुर्चीवर ठेवलेली बॅग गायब असल्याचे फिर्यादींना आढळून आले. त्यांनी रेस्टॉरन्ट कर्मचारी व व्यवस्थापकाकडे विचारपूस केली. नंतर रेस्टॉरन्टची सीसीटीव्ही तपासण्यात आली. तेव्हा संशयित आरोपी वेटरने बॅग चोरली व आतील पैसे घेऊन आपल्या सामानासह तो नोकरी सोडून पळाल्याचे दिसून आले.
दरम्यान, संशयित आरोपी हा मंगळवारीच सदर रेस्टॉरन्टमध्ये कामासाठी आला होता. नोकरीच्या पहिल्याच दिवशी बुधवारी ग्राहकाची पैशांची चोरी करत तो पसार झाला आहे. याप्रकरणी कळंगुट पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक नरेशकुमार साळगावकर हे तपास करीत आहेत.