सायबर गुन्हा पोलिसांकडून फरिदाबादमधील एकाला अटक

म्हापसा : तिसवाडीतील एका ज्येष्ठ नागरिकाला जास्त परतावा देण्याच्या नावाखाली अप्पर सर्किट (यूसी) व इनिशियल पब्लिक ऑफरिंग स्टॉकमध्ये (आयपीओ) रक्कम गुंतवायला लावून १.६४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या आर्थिक फसवणूक प्रकरणातील एक संशयित आरोपी पुष्कर लोकेश गोयल (३२, रा. फरिदाबाद हरियाणा) याला गोवा सायबर गुन्हा विभागाने अटक केली. संशयिताच्या बँक खात्यामध्ये फसवणुकीतील रकमेपैकी २८ लाख रुपये रक्कम हस्तांतरित झाली होती.
आर्थिक फसवणुकीचा प्रकार १८ ऑक्टोबर २०२५ ते १६ जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत घडला होता. या प्रकरणी सायबर गुन्हा विभागाने १९ जानेवारी रोजी फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) व ३१९(२) आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला होता.
मूळ उत्तर भारतीय आणि जुने गोवे, तिसवाडी येथे वास्तव्यास असलेल्या फिर्यादींकडे अज्ञात संशयितांनी वॉटस्अॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. नंतर त्यांनी तक्रारदारांना आपल्या एका वॉटस्अॅप ग्रुपमध्ये जोडले. त्यांनी स्वतःची ओळख डाल्टन इन्व्हेस्टमेंट इंक भागीदार म्हणून दाखवली आणि आपण रिलेटर असोसिएशन मुंबईशी संबंधित असल्याचे सांगितले.
संशयितांनी तक्रारदाराला सेआह आणि पीएलएआय कंपनीच्या अप्पर सर्किट (यूसी) व इनिशियल पब्लिक ऑफरिंग स्टॉकमध्ये (आयपीओ) गुंतवणूक करण्यास प्रवृत्ते केले. या गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे भासवले. वरील काळात फिर्यादींनी भारतातील वेगवेगळ्या बँकांतील १३ खात्यांमध्ये १ कोटी ६४ लाख ३९ हजार १९० रुपये ६२ पैसे जमा करण्यास भाग पाडले.
चौकशीवेळी फिर्यादींची फसवणूक केलेल्या रकमेतील २८ लाख रुपये हे फरिदाबाद हरियाणामधील श्रीमती गोयल यांच्या खात्यात हस्तांतरित झाल्याचे सायबर गुन्हा विभागाला आढळून आले. हे बँक खाते संशयित पुष्कर गोयल याच्या आईचे असून तो हे खाते हाताळत होता. त्यानुसार पोलिसांनी संशयिताच्या घरी जाऊन त्याच्या मुस्क्या आवळल्या व गोव्यात आणून अटक केली. संशयिताला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, सहाय्यक अधीक्षक बी.व्ही. श्रीदेवी व निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पोवळेकर, हवालदार अनय नाईक व महिला कॉ. सुवर्णा गावडे या पथकाने ही कामगिरी केली.
गोयलच्या खात्यात २.४० कोटींचे व्यवहार
गोयल याच्या कथित बँक खात्यामध्ये गोव्यासह महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या निगडीत प्रकरणांतील एकूण २.४० कोटी रुपये रक्कम हस्तांतरित झाल्याचे पोलीस चौकशीत आढळून आले आहे. तसेच वरील फसवणूक प्रकरणातील रक्कम हस्तांतरित झालेल्या इतर १२ बँक खातेधारकांचा शोध सायबर पोलीस घेत आहेत.