मुरगाव बंदर प्राधिकरणाचा जागा मालकी हक्कासंबंधी दावा

वास्को : मुरगाव बंदर प्राधिकरणाने मालकी हक्कासंबंधी दावा केलेल्या सडा चौकातील जागेवर शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी काहीजणांचे जबाब घेतले आहेत. याप्रकरणी संबंधित शिवप्रेमींनी तेथील जागेसंबंधी त्यांची मते व्यक्त केली आहेत.
सडा व परिसरातील शिवप्रेमींनी एकत्र येऊन सडा चौकात शिवजयंतीच्या दिवशी महाराजांचा पुतळा उभारला होता. या पुतळ्याचे अनावरण मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. या जागेवर मुरगाव बंदर प्राधिकरणाने आपल्या मालकी हक्कासंबंधी एक फलक उभारून तेथे पुतळा उभारण्यास अटकाव केला होता. तसेच तेथे आदल्या दिवशी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा व झाकण्यात आलेला पुतळा हटविण्यासंबंधी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी गोवा सरकार, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, मुरगावचे उपजिल्हाधिकारी, मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक, मुरगाव पालिका इत्यादींना प्रतिवादी केले आहे. या सर्वांना पत्रे पाठवून तेथील बांधकाम थांबविण्याची व पुतळा हटविण्यासंबंधी विनंती करण्यात आली होती, असे प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास आडकाठी येत असल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त झाला होता. त्यानंतर दि. १९ रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी तेथे पुतळा उभारण्यासंबंधी गेले दोन वर्षे कोणत्या प्रकारे प्रयत्न करण्यात आले, मुरगाव बंदर प्राधिकरणाकडे त्या जागेसंबंधी कोणती चर्चा करण्यात आली यासंबंधी आमदार आमोणकर यांनी माहिती दिली होती. त्यावेळी तेथे जमलेल्या शेकडो शिवप्रेमींनी तेथे जल्लोष केला होता.
विनावापर जागेचा वापर केल्याचा दावा
मुरगाव पोलीस स्थानकात काहीजणांना जबाबासाठी बोलाविण्यात आले होते. त्या सर्वांनी तेथे जाऊन आपला जबाब दिला. तेथे विनावापर व घाण असलेल्या जागेचा वापर आम्ही चांगल्या गोष्टीसाठी केला असल्याचा दावा काहीजणांनी केला. काहीजण आपला जबाब देण्यासाठी दि. २१ रोजी मुरगाव पोलीस स्थानकात जाणार आहेत.